Wednesday, 23 May 2012

हिंदु …

भगवा रंग… झाकोळला गेलाय.
संत तुकाराम, रामदास स्वामींनी खांद्यावर दिलेली भगव्या रंगाची पताका घेउन जेंव्हा  शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर उभे राहिले असतील, आणि आपला हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचा निर्णय सांगितला असेल तेंव्हा जिजाऊंच्या डॊळ्यात पाणी नक्कीच तराळले असेल नाही का?? मग त्या पाणी भरलेल्या डोळ्य़ांनी जेंव्हा आपल्या १६- १७ वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर त्या माऊलीने आपला हात ठेऊन आशीर्वाद दिला असेल तेंव्हा शिवरायांच्या मनातल्या त्या हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचे स्वप्न कधी ना कधी तरी पुर्ण होईलच अशी खात्री असेलच, म्हणूनच त्या माऊलीने आपल्या काळजाच्या तुकड्याला हातामधे तलवार घेऊन बाहेर जाऊ दिले असेल .
दुर्दैवाने आज पर्यंत  ते स्वप्न   पुर्ण झाले नाही- आणि कधी होण्याची अपेक्षाही नाही. ’स्वराज्य’ तर मिळाले, पण ’सुराज्य’ मिळायची आम्ही अजूनही वाट पहातोय.   हिंदूपदपातशाही स्थापनेच्या स्वप्नाला तर नेत्यांनी सरळ………असो लिहित नाही जास्त, कारण विनाकारण विषयांतर होईल.
स्वतःला हिंदू  म्हणवून घेण्या पेक्षा निधर्मी म्हणवून घेण्याकडे आपल्या नेत्यांचा  कल वाढतोय. लोकांना अभिमान वाटतोय  हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा निधर्मी   म्हणवून घेण्याचा.  हिंदुस्थानचा भारत कधी झाला ते समजलेच नाही.
शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या खांद्यावर दिलेल्या त्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे आज काय झाले आहे? प्रत्येक पक्षाने त्यामधे आपले वेगवेगळे स्वार्थाने लडबडलेले  ’बेगडी’ रंग मिसळून भगव्याची  पार  वाताहात करून टाकली आहे.  कोणी त्यामधे हिरवा,  कोणी हिरवा +निळा ,  मिसळतो , तर कुठला तरी एखादा पक्ष आपला निधर्मी स्वरूप एंडॉर्स करायला पांढरा रंग पण  वापरतो.
दुर्दैवाने आज  प्रत्येकच पक्षाला शिवाजी महाराजांची आठवण येते ती फक्त राजकारणासाठी! त्यांचं स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य  स्थापन करणे.  ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने धुरा दिली होती , त्यांनी आपली जबाबदारी हे आपल्या  खांद्यावरचं हे भगव्या रंगाचं “ओझं” आहे असे समजून काढून फेकण्यात, आणि निधर्मी रंगीबेरंगी झेंडे घेऊन नाचण्यात  मोठेपण मानतात.
अरे कशासाठी त्या माऊलीने आपल्या लेकराला घोड्यावर बसवून उन्हातान्हात  लढायला पाठवले होते?? कशासाठी शेकडॊ मावळ्यांनी   आपला जीव दिला ??  श्री  शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी हिंदूपदपातशाही होती ती हीच का?? हा प्रश्न मला कालपासून छळतोय.
कालच एक बातमी वाचली.  फ्रान्स सरकारने बुरखा घालण्याकरता कायद्याने बंदी घातली आहेच. आता अशी बातमी आहे की आता फ्रान्स चे  सरकार बहुपत्नित्वाचा कायदा रद्द करणार आहे. कुठल्याही धर्माच्या लोकांना एका पेक्षा जास्त लग्नं करण्यात येणार नाहीत. बऱ्याच लोकांचे नागरीकत्व रद्द होण्याचे चान्सेस पण आहेत. त्या पार्श्वभूमीवर    आपल्या सरकारचे बोटचेपे धोरण मात्र बरेचदा मनःस्ताप देऊन जाते.
सरकारने तर हिंदू असल्याबद्दल जिझिया कर तर लावलेला नाही, पण  हिंदू असल्याबद्दल तुम्हाला लाज वाटावी असे वागणे  निश्चितच सुरु केले आहे.  कदाचित त्या दिशेने वाटचालही सुरु आहे.
तूम्ही हिंदू आहात?? तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कशाला हवा?? बुट पॉलीश करा, रामागडी म्हणून कामं करा, गेला बाजार, भाजी विका, मासे विका, .. शिक्षण ?? छे …  ते   तुमच्या साठी   नाही- आणि जर तरीही शिकायची इच्छा असेलच, तर पदरचे पैसे खर्च करून शिका!.
सरकारने इतर सगळ्या धर्मियांना  जास्तीत जास्त फॅसिलिटीज द्यायच्या आणि हिंदूंना मात्र शक्य तितके ताणायचे असे धोरण अवलंबिले आहे. लांगूलचालनाची परंपरा मात्र काही राजकीय पक्ष अगदी इमाने इतबारे  आणि काटॆकोर पणे जोपासताहेत. . असो!!
यावर एक छान लेख वाचला होता आणि त्यावर लिहिण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते पण नंतर राहून गेले .   त्या लेखा मधे एक पत्र लावलेले दिसले, ते इथे पेस्ट करतोय. त्याबद्दल  जास्त काही लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्र वाचले की सगळे समजेल.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं..महाराज, आम्हाला क्षमा करा. आम्ही चुकलो.. आपल्याला अभिप्रेत असलेला हिंदुस्थान आणि हिंदुपदपातशाही   आम्हाला समजलीच नाही.

अंबानींचं घर

ambaniमुकेश अंबानी  करोडॊ रुपये किमतिचं घर बांधताहेत अल्टमाउंट रोडला , मुंबईला. प्लॉट्ची साइझ तशी मॉडरेट आहे .. फक्त ४५३२ स्क्वेअर मिटर्स.. म्हणजे साधारण ४५ हजार स्क्वेअर फुट. ही जागा अंबानींनी २००२ मधे विकत घेतली होती.त्याच्या बद्दल खरं तर बरंच येउन गेलंय.. पण इथे एक फोटॊ पोस्ट करतोय..आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे खाली.
२७ मजले.. काचेच्या तावदानांचा पुढचा भाग असलेली बिल्डींग असेल ही.  या बिल्डींग मधे १६० कार्स आणि तिने हेलिपॅडची सोय असेल.
इतकं मोठं घरं म्हंटलं की नोकर माणसं आलितंच. म्हणुन जवळपास ६०० स्टाफची सोय असेल इथे .
घराच्या प्लॅन प्रमाणे १७३ मिटर उंचिची बिल्डींग असेल ही. जर एखादी रेगुलर बिल्डींग असती तर एवढ्या उंचिच्या बिल्डींग मधे ६० मजले उभे केले असते बिल्डरने. पण इथे तसं नाही. फक्त २७ मजलेच आहेत.
असं म्हणतात की खालचे सहा मजले फक्त पार्किंग करताच राखिव आहेत. जवळपास १६८ इम्पोर्टेड कार्स पार्क करण्याची व्यवस्था इथे केल्या गेली आहे.
एका मजल्यावर एक फुल फ्लेज्ड सिनेमा हॉल कम एंटरटेनमेंट सेंटर असेल. ह्या मधे काय काय एंटरटेनमेंट असेल हे तर अजुन फारसं कळलेलं नाही. पण सिनेमा व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी असाव्यात.. जसे स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, इन डॊअर स्विमिंग पुल, जिम.. वगैरे..
मिनी थिएटरचा रुफ टॉप हा गार्डन साठी असेल. आणि वरच्या बाल्कनी मधे पण टेरेस गार्डन असेल.  टेरेस गार्डन म्हंटलं की मला आपलं ते चार पाच कुंड्या बाल्कनीत ठेऊन त्यात लावलेले क्रोटन्स आठवतात.. पण तसं नाही हं इथे.. :)
नऊवा दहावा आणि अकरावा फ्लोर हा हेल्थ फोअर म्हणुन इअर मार्क केला गेलाय. इथे स्विमिंग पुल, अथलेटीक गेम्स कोर्ट,वगैरे असेल.
त्याच्यावरचे दोन मजले अंबानी परिवाराच्या गेस्ट लोकांसाठी असतिल. सगळ्यात वरचे चार मजले जे अरेबियन सी चा व्ह्यु देतिल, ते सगळे मुकेश आणि त्याच्या बायको आणि दोन मुलांसाठी आहेत. म्हणजे प्रत्येक मजल्यावर फक्त एकच जण रहाणार.
ह्यांच्या घराच्या वरचे दोन फ्लोअर्स हे मेंटेनन्स एरिया म्हणून रहातिल . आणि सगळ्यात वर एअर स्पेस फ्लोअर असेल.
ह्या घराची एस्टीमेटेड किंमत आहे. ४००० करोड….. हुश्श.. समोर किती शुन्य द्यायचे हे न कळल्यामुळॆ शब्दामधे करोड लिहिलंय..

प्रेमात पडलेल्यांची लक्षणं….

बरेचदा असं होतं, की  लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन.  तर अशा लोकांसाठी त्यांना समजावं की आपण प्रेमात पडलो आहोत म्हणुन मुद्दाम हे पोस्ट टाकतोय. प्रेमात पडलेल्यांची लक्षणं. तुम्ही स्वतःला या मधली किती लक्षणं लागु होतात ते पहा, आणि या प्रेम रोगावर ’योग्य’ रिपिट ’योग्य’ ते उपचार करुन घ्या..
१) जिच्यावर प्रेम आहे तिच्या व्यतिरिक्त  जगातिल  प्रत्येकच मुलगी दिसायला ’तिच्यपेक्षा डावी’ दिसु लागते. मग यामधे  ऐश्वर्या रायचा फोटो जरी समोर ठेवला, तर ऐश्वर्याचं पण नाक वाकडं दिसु लागतं..
२) प्रत्येकच वस्तु मधे तिचा चेहेरा दिसु लागतो.  जिथे पहावं तिथे ती आहे असा भास होतो.
३) फोनची रिंग वाजली की  तुम्ही फोन कडे धावता, तिचाच फोन आला असावा असं वाट्तं रहातं सारख.
४) एकदा तिच्याशी फोन वर बोलणं सुरु झालं की ते कधी संपुच नये असं वाटतं. फोन ठेवतांना तिने फोन बंद केल्याशिवाय तुम्ही हॅंग करित नाही.
५) तिच्या प्रत्येक ’मिसकॉल’ची आतुरतेने तुम्ही वाट पहात असता. आणि मिसकॉल मिस होण्यापुर्वीच कॉल बॅक करता. आपल्या प्रिपेड कार्डच्या बॅलन्स ची केअर न करता…
६) मित्रांशी तुम्ही खोटं बोलणं सुरु करता.
७) स्टॅग पार्टीला जाउन मित्रांबरोबर मस्ती करण्यापेक्षा   तिच्या बरोबर पेटीकोट,भाजी, ओढणी सारख्या  फालतु गोष्टी शॉपिंगला जाणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटू लागतं.
८) तिच्या बरोबर अगदी रडूबाई सिनेमा पण तुम्ही आवडिने पहाण्यास तयार असता. प्रसंगी न कळणाऱ्या भाषेतिल चित्रपट जसे शंकराभरणम वगैरे पण तुम्ही ’आवडीने’ पहाता .
९)जगातली सगळ्यात सुंदर मुलगी म्हणजे ’ती’च हे अगदी पक्कं बसतं मनामधे.. आणि ते मत म्हणजे  काळ्या दगडावरची रेघ असते.
१०) आईने / वडिलांनी हाक मारली तरी पण ऐकु येत नाही
११) सिध्दीविनायकाच्या ट्रिप्स वाढल्या असतात.
१२) क्लास मधे शिकवत असतांना लेक्चरर पेक्षा तिच्या कडे जास्त लक्ष जातं.
१३) कोरा कागद, आणि पेन सापडला, की त्यावर आपोआप तिचंच नाव लिहिलं जातं
१४) दुकानात नविन पेन विकत घ्यायला गेलात, तरी पण लिहुन पहातांना स्वतःच्या नावा ऐवजी तिचंच नांव लिहुन पेन चेक करता.
१५)बॉस ला फोन करायला म्हणुन रिसिव्हर उचलता, आणि तिचा नंबर डायल करता.
१६)कुठेही वर्तुळाकार वस्तु दिसली की त्या मधे तिचाच चेहेरा दिसणं सुरु होतं.
१७)शिर्डीच्या साईबाबाचा दोरा हाताला बांधला असतो. प्रत्येक मंदिरासमोर येता जाता हात जोडुन उभे राहिल्याशिवाय बरं वाटत नाही.
१८)ऑफिसचा रस्ता तिच्या घरासमोरुन जातो. आता ऑफिस पश्चिमेला आणि तिचं घर पुर्वेला असलं तरीही..
१९)तिच्या भावाशी मैत्री करण्यासाठी तुम्ही काहिही करण्यास तयार असता.
२०) तिचे मित्र मैत्रीणी आपले पण मित्र व्हावेत म्हणुन तुम्ही पदरचे पैसे खर्च करायला पण तयार होता. केवळ तिचा सहवास लाभावा म्हणुन..
२१)तिला आवडतं म्हणुन तुम्ही अगदी चाटवाल्या भैय्याच्या गाडिवर -(ज्याला तुम्ही नेहेमी शिव्या घालता, घाणेरडा म्हणुन )तिच्या सोबत उभे राहुन चाट आवडिने खाता..
२२) तिचे वडिल दिसले की तुम्ही अगदी शालिनपणाचा मुखवटा पांघरुन ( कारण तुम्ही शालिन नाही हे मला माहिती आहे ) त्यांना गुड मॉर्निंग , गुड इव्हिनिंग, किंवा हॅव अ नाइस डे अंकल करता तेंव्हा.. नक्कीच!!
२३)तिच्या भावाला बुलेटवर बसुन येतांना तुम्हाला साक्षात यमराज रेड्यावर बसुन आल्याचा भास होतो.
२४)तुम्ही बुक एक्झीबिशन मधे मुद्दाम जाता आणि शेर ओ शायरी, किंवा गझल्स ची पुस्तकं  विकत आणता.
२५) रॅप, किंवा डीस्को ऐवजी तुम्हाला गझल ऐकत रहाणं आवडतं . तलत मेहमुद एकदम फेवरेट सिंगर बनतो. या जगात फक्त तलत चा आवाज शाश्वत आहे बस्स.. बाकी सब कुछ झुट है! असं वाटु लागतं.
२६)तिला आवडतो ,म्हणुन तुम्ही गुलाबी किंवा पर्पल कलर चा शर्ट विकत घेता आणि आवडिने घालता..
२७)एकटे बसले असला की दिवा स्वप्न पहाणं सुरु करता.त्या स्वप्नात केवळ तुम्ही आणि ती.. बस इतर कोणिच नसतं. लोकांना ब्लॅक ऍंड व्हाईट स्वप्न पडतात, तर तुम्हाला कलर!!
२८)झोपेचं पार खोबरं होतं. रात्री तासन तास तुम्ही तळमळत काढता तिच्या आठवणीत..
२९)तुमचे ऑफिस जरी १० वाजता असले, तरी तिच्या वेळेवर म्हणजे सकाळी ८ वाजता तुम्ही घरुन निघता, आणि तिच्याच बसने प्रवास करता.
३०) सिनेमाची हिरोइन पण तिच्या सारखीच दिसायला लागते, आणि हिरो तुमच्या सारखा.
३१)तिच्या नावाच्या स्पेलिंगचं प्रत्येक अक्षर सेक्सी दिसु लागतं.
३२) तिच्या कडे पाहिलं की ताजमहाल पाहिल्याचं समाधान मिळतं.
३३)तिच्या नावातले, आणि तुमच्या नावातले कॉमन अक्षरं तुम्ही शोधुन त्यांची न्युमरॉलॉजी ने व्हॅल्यु काढता..
३४) तुम्ही मेसेंजर वर नेहेमी अदृष्य रहाता, ती आल्यावर इतर मित्रांनी त्रास देउ नये म्हणुन..  आणि तुम्हाला फक्त तिच्याशीच चॅट करायला आवडतं . चॅटींग कमित कमी दोन तास.. एका बैठकीत..
३५)मित्रांनी बोलावलं, तर टाळुन तिच्या घरासमोर जाउन टाइम पास करणं तुम्हाला जास्त आवडतं.
३६) तिच्या कॉलेज समोरचा कॅंटीनवाला तुम्हाला उधार द्यायला पण तयार होईल इतके वेळा तुम्ही तिथे जाउन बसता.
३७)कपड्यांच्या बाबतीत तुम्ही खुप सेंटीमेंटल होता. आणि नेहेमी अगदी अप टु डेट रहाता.. काय सांगावं ती कधी भेटेल ते??
३८)जगातली सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे उर्दू ( जरी येत नसली तरीही) वाटू लागते. मराठी एकदम डाउन मार्केट.
३९)अरुण दाते एकदम फेवरेट सिंगर होतो. मग दिवस तुझे हे फुलायचे ऐकलं, की तिचा चेहेरा डोळ्यापुढे येतो.
४०) नॅटकिंग कोल चे लव्हसॉंग्ज पण खुप आवडायला लागतात..
४१)गुलाम अलीचा मधाळ आवाज हदयाला घरं पाडतो, आणि शक्य होईल तेंव्हा तुम्ही ऐकत असता ही गाणी. बरेचदा बडे गुलाम अली खां पण ऐकायचा प्रयत्न करता तुम्ही.
४२)भुक वगैरे काही लागत नाही, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म या उक्ती प्रमाणे जे काही पानात पडेल ते तुम्ही न कुरकुरता खाता. अगदी शेपुची भाजी सुद्धा.आणि जर आईने आश्चर्याने पाहिलं तर शेपु कसा तब्येतिला चांगला, यावर पण बोलता..
४३) भांग व्यवस्थित मनासारखा जमल्याशिवाय आणि कपड्यांना कडक इस्त्री असल्याशिवाय  घराबाहेर पाउल पडत नाही , ( काय सांगावं ती कधी भेटली तर कुठे??).
४४)ऑर्कुट स्क्रॅप या कम्युनिटीला जॉइन करुन रोज तिला नविन कुठला स्क्रॅप पाठवायचा याची काळजी करित बसता.
४५) तिच्या फ्रेंड लिस्ट मधे एखादा ’नको असलेला’ तर ऍड होत नाही, याची खात्री करुन घेण्यासाठी तिच्या फ्रेंड्स्च्या प्रोफाइलला रेग्युलरली मॉनिटर करता.
४६)लव्ह, प्रेम, प्यार शब्द असलेले एस एम एस शोधुन तिला पाठवता..
४७) तिला गुड मॉर्निंग म्हंटल्या शिवाय तुमचा दिवस सुरु होत नाही, आणि गुड नाईट म्हंटल्याशिवाय रात्र!!
४८)तिच्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे असे वाटु लागते.
४९)तिला पहायला कोणी आलं की तुमचा जीव कासाविस होतो, आणि तुमच्या मंदिराच्या फेऱ्या सुरु होतात.
५०)तुमचे संध्याकाळी पाच वाजता भेटायचे ठरले असतांना, तुम्ही मात्र चक्क एक तास भर आधी तिथे जाउन तिची वाट पहाता.. अजिबात कुरकुर न करता.वाट बघतांना एक एक सेकंद तुम्हाला एक एक युगा प्रमाणे वाटतो , आणि दर दोन मिनिटांनी तुम्ही घड्याळाकडे पहाता..
५१)समोर कागद – पेन असेल तर तुम्ही  सौ. तिचं नाव+ तुमचं नाव+ तुमचं आडनाव लिहुन पहाता,आणि खुळ्यासारखे स्वतःशीच हसता.
५२)?????
अजुन बरेच काही असतिल पण इथे थांबतो आता. पुढची लक्षणं तुम्ही स्वतःचा लिहा खाली कॉमेंट्स मधे..
( आणि हो.. प्रेमात न पडलेल्यांची लक्षणं लवकरच.. पुढल्या शनिवारी पोस्ट करणार  आहे.. )

फ्लर्टींग

सला विषय घेतलाय लिहायला आज- माझं मलाच कळत नाही. कदाचित गोव्याला येण्याचा परिणाम असावा हा. एका मित्राच्या मुलीचे लग्न आहे आज, आणि त्या साठी गोव्याला आलोय. संध्याकाळी फिरायला चौपाटीवर गेलो होतो, तेंव्हा समुद्र किनाऱ्यावर एक मुलींचा कंपू दिसला. बहुतेक कुठल्यातरी कॉलेजची सहल असावी. काही मुलं पण बरोबर होती. त्या मधला एक मुलगा उगाचच त्या मुलींच्या पुढे पुढे करीत होता. काही खास ’लक्ष्य’ न ठेवता नुसतं पुढे पुढे केल्याने काहीच फायदा होत नसतो हे त्याला समजले नव्हते बहुतेक. मी समोरच रेती वर बसलो होतो, आणि निरीक्षण केलं, तर आता पुढे पुढे म्हणजे – उगाच मोठमोठ्याने काहीतरी बोलत होता, आणि निरर्थक बोलत होता.
गोव्याच्या समुद्रावर दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे सुटी काढून मजा करायला आलेले, आणि दुसरे म्हणजे एकटे काही कामा निमित्त गोव्याला आलेले, आता संध्याकाळी वेळ जात नाही म्हणून समुद्रावर फिरायला आलेले. दुसर्‍या प्रकारचे लोक हे ’बघे’ या प्रकारात मोडतात. काही करायचं नसतं, मग एखाद्या शॅक मधे बिअरचे घोट घेत इकडे तिकडे (???) बघत वेळ घालवायचा झालं!! तर मी इथे गोव्याला बघ्याच्या आणि एकांड्या शिलेदारांच्या भूमिकेत होतो, म्हणून प्रकर्षाने जाणवलं इतकंच.
जगामधे खरं तर दोनच जाती आहेत. एक नर आणि दुसरी मादी. नराने मादीच्या भोवती रुंजी घालायची हे सगळ्या पक्षां मधे पण दिसून येते. त्या साठी देवाने पण नर पक्षाला सौंदर्य दिलेलं असतं. चिमणा बघा कसा ऐटदार दिसतो, गळ्याभोवती छान काळी आयाळ असल्याप्रमाणे काळा ठिपका, थोडासाच मोठा असलेला आकार, त्याच प्रमाणे कोंबडा मस्त पैकी डोक्यावर तुर्रा घेउन कोंबड्यांच्या भोवती कुचकुचत गोल गोल फिरणारा, वर आभाळाकडे बघून पिसारा फुलवत लांडोरीला केकारव करत साद घालणारा… या सगळ्यांकडे बघितलं की देवाने ’नराला’ मादीला आकर्षित करुन घेण्यासाठीच हे सगळं काही दिलंय असं वाटतं. मादीला मात्र काहीच करावे लागत नाही. फक्त नराची निवड करायची असते. फ्लर्टींग इथे पण असतंच! आणि अगदी हेच नियम पुरुष स्त्री ला पण लागू ठरतात.
पुरुष अथवा स्त्री कितीही वयाचे असो, फ्लर्टींग बद्दल कधीच आकस नसतो. ६५-७० वर्षांच्या आजी पण जेंव्हा मॅचिंग ब्लाऊज शिवाय साडी नेसत नाहीत, किंवा बाहेर पडतांना पावडर कुंकू केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत… तसेच आजोबा पण अजूनही ६५ ला आले तरीही ते जिन्स घालतात आणि सोबतच नायकेचे बूट घालून फिरायला जातात हे सगळं कशाचं लक्षण म्हणायचं? प्रत्येक स्त्रीला पुरुषांनी आणि पुरुषाला स्त्री ने एकदा तरी आपल्याकडे वळून पाहिलंच पाहिजे असं वाटत असतं! या मधे लैंगिक भावना असते असे नाही, पण विरुद्ध लिंगी असे जन्मतःच असलेले नैसर्गिक आकर्षण असते. अर्थात ’गे’लेले काही अपवाद वगळून.
पक्षी आणि मानव या मधे मुख्य फरक एकच – तो म्हणजे पक्षी खुलेआम मादीला आकर्षित करायला फ्लर्ट करतात, पण मानव मात्र चुपके चुपके हा प्रयत्न करीत असतात. खूप मजेशीर खेळ आहे हा, प्रत्येकालाच खेळायला आवडतो.. खेल खेल मे हा ऋषीकपूरचा सिनेमा मला खूप आवडायचा . डझनभर तरी वेळा पाहिला असेल. त्या सिनेमामधे दाखवलेले फ्लर्टींग इतकं रोमॅंटीक वाटायचं, की आपणही तसंच कुणाला तरी गाठावं असं वाटायचं. :)
पुरुषांना काही सुंदर पिसारा दिलेला नसतो मोरा प्रमाणे, किंवा सिंहा प्रमाणे आयाळ पण नसते. त्या मुळे स्त्रीयांना आकर्षित करायला खास प्रयत्न करावे लागतात. हेच खरे कारण आहे की फ्लर्ट करणे हे थोडे अवघड होते पुरुषांना. पण ते खरंच इतकं अवघड असतं कां? मला नाही वाटत!! इथे थोडं लिहितोय त्या बद्दल.
फ्लर्ट करता येण्यासाठी सर्वप्रथम एक मुलगी पाहिजे – ती कुठलीही चालेल, तुमच्या कंपूमधली, ओळखीमधली, मैत्रीण, बहिणीची मैत्रीण कोणीही चालेल, आणि तुम्हाला तिच्या बद्दल काही तरी वाटत असायला पाहिजे. एकदा भेट झाली की तुम्हाला कुठल्याही विषयावर बोलता यायला हवं, एखाद्या विषयावर बोलणं सुरु केलं, आणि लक्षात आलं, की तिला त्या विषयात रस नाही, की ताबडतोब विषय बदलता यायलाच हवा. आणि ज्याला हे व्यवस्थित जमतं तो जिंकला. तिने तुम्हाला पाहिलं, तुम्ही तिला पाहिलं, पहिली छाप ही केवळ बोलण्यावरूनच पडते. तुम्ही काय कपडे घातले आहेत, किंवा तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुमचे वागणे, आणि तुम्ही कसे बोलता हे जास्त महत्वाचे ठरते. फ्लर्टींगची पहिली शिडी म्हणजे गप्पा गोष्टी . तुम्ही ह्यात जितके तरबेज – तितके फ्लर्टींगमध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त.
कुठल्याही विषयावर बोलणं सुरु केलं, आणि एकदा तिच्या आवडीचा विषय आहे हे लक्षात आलं, की मग त्याच विषयावर चिकटून रहाणं, आणि विषयापासून वहावत न जाता आत्मविश्वासाने बोलत रहाणं ( प्रसंगी अती-आत्मविश्वासाने) हे पण महत्वाचे आहे. नाहीतर तुम्ही तुमच्याच नकळत तिच्या आवडीच्या विषयावरुन तुमच्या आवडीच्या विषयाकडे कसे जाता हे लक्षातही येत नाही, आणि ती कंटाळते. . असं होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. इथे थोडी काळजी घ्यायलाच हवी नाहीतर तिला तुमच्या सहवासाचा पण कंटाळा येऊ शकतो, आणि एकदा ’कंटाळवाणा प्राणी’ हा शिक्का बसला की सगळं संपलंच..आयुष्यभर मैत्रीण मिळणार नाही हे नक्की. इथे पुन्हा फ्लर्टींगचाच एक भाग असतो ही तरूणपणी असलेली मैत्री म्हणजे.
सुरुवातीला तिचा क्वॉंटम फिजिक्स मधला रस किंवा एचटीएमएल मधले प्राविण्य तुम्हाला माहिती असेल तरीही सुरुवात ही विनोदी गोष्टींपासून केली तर कधीही चांगले .कितीही गंभीर स्वभावाची स्त्री असली तरीही हा विषय सदाबहार असतो. तिला हसवत ठेवणे, आनंदी ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. जरी ती क्वॉंटम फिजिक्स मधे पिएचडी /पोस्ट ग्रॅज्युएशन करित असेल तरीही तिचा आवडीचा विषय तो नसतो – बरेचदा ती एक गरज म्हणून अंगीकारली  असते हे लक्षात घ्या. नुसते विनोदावर ची पु्स्तकं वाचून विनोद सांगू नका. एसएमएस वर आलेले विनोद कदाचित तिला पण आलेले असतात त्या मुळे ते शक्यतो टाळा, किंवा सांगण्यापूर्वी विचारा, हा एसएमएस आलाय का तूला म्हणून?
प्रत्येकच मुलीला आपण सगळ्या कंपूमधे जास्त आकर्षक आहोत असे वाटत असते. ( ते खरे आहे की नाही हे महत्वाचे नाही) स्वतः जगत सुंदरी असल्याचा त्यांचा अघोषित दावा असतो. अर्थातच तिच्या कडे जास्तीत जास्त लक्ष दिले जावे अशी तिची सुप्त इच्छा असते. आपल्याला एखाद्या राजकन्येसारखी वागणूक मिळावी अशी तिची अपेक्षा असते, आणि जो कोणी हे करेल तो जिंकला-ही गोष्ट कदाचित कोणतीच मुलगी मान्य करणार नाही, पण प्रत्येक पुरुषाने हीच गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. मुली या तर्कापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात. त्यांच्यातल्या भावनेला तुम्ही कशी फुंकर घालू शकता हे महत्वाचे . फ्लर्टींग पुरुषाचा जन्मसिध्द अधिकार आहे, पुरुषाने फ्लर्ट करावे अशी प्रत्येकच स्त्री ची इच्छा असते.
पुर्वी पण लिहिलंय कधीतरी.. की लठ्ठपणाच्या बाबतीत आणि केसांच्या बाबतीत प्रत्येकच मुलगी अतिशय संवेदनशील असते. तेंव्हा कितीही रोड असली तरीही , तिला आपण लठ्ठंच आहोत असे वाटत असते.थोडे सांभाळून आणि नाजूकपणे हा विषय हाताळा. फ्लर्टींग करतांना, हॉटेल मधे खाताना शक्यतो या विषयावर बोलणे टाळले पाहिजे. नाही तर एखादा पिज्जा वगैरे मागवून डायटींगच्या गप्पा मारणॆ म्हणजे.. .. ती दूर गेलीच समजा तुमच्या पासून. तिला जर तुम्ही तुमच्या बोलण्याने खुलवू शकणार नसाल तर तिच्याबरोबर फ्लर्टींग विसराच!!
मादीला नराबद्दल आकर्षण आहे की नाही हे समजणं पक्षांच्या बाबतीत खूप सोपं असतं . मोर पण जेंव्हा लांडोरीसमोर पिसारा पसरवून नाच करतो तेंव्हा तो तिच्याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करतो- पण त्याला बरोबर समजतं की ती त्याच्याकडे आकर्षित होतेय ते. पण पुरुषांना हे समजायला कित्येक दिवस जाऊ द्यावे लागतात. कधी तर वर्षानुवर्ष समजत नाही !!
स्त्रियांना एक सहावं इंद्रिय असतं. कुणी त्यांच्या कडे तसे पहायला लागले की त्यांच्या लगेच लक्षात येते. एखाद्या मुलीकडे पाहाताय, आणि तिला ताबडतोब तशी जाणीव होत असते. तिचा तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न सुरु होतो. मग ह्या खेळामधे एखाद्या वेळेस नजरेला नजर मिळाली तर अपराधीपणाची भावना येऊ देता कामा नये. ही सुरुवात समजायची- फ्लर्टींग बद्दल अजून तर बरंच काही लिहिलं जाउ शकतं पण … कितीही लिहिलं तरीही ते कमीच आहे. फ्लर्टींग ही एक सामाजिक गरज आहे. आता सामाजिक गरज हे लिहिलेलं काही लोकांना पटणार नाही. पण माझ्या ब्लॉग वर एक लेख लिहीलाय खूप दिवसा पुर्वी- ’स्त्री पुरुष इंट्रेस्टींग सर्व्हे’ म्हणून. एका प्रथितयश वृत्तपत्राने एक सर्वे केला होता. त्याचे जे निष्कर्ष मिळाले, ते खूपच मजेशीर होते. पुर्वी लिहिलं होतं ब्लॉग वर इथेच..
पूर्वप्रसिध्दी:- ऋतू हिरवा

Sunday, 13 May 2012

बंदी घातलेली पुस्तकं..

कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच  बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल   वाचण्यात आलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचायची  इच्छा वाढली होती. थोडी राजकीय , पण बरीचशी श्रृंगारिक पुस्तकं होती बंदी घातलेल्या पुस्तकांमधे .  लेखकांवर अशी पुस्तकं लिहिल्या बद्दल   खटले  चालवून   लेखकांना अटक पण करण्यात आली होती-  आता, इतकी गाजलेली पुस्तकं, मग त्यामधे काय असेल ही उत्सुकता  काही शांत बसू देत नव्हती- ती पुस्तकं एकदा तरी वाचलीच पाहिजे अशी इच्छा व्हायची .
नेटवर बहुतेक सगळी पुस्तकं पिडीएफ मधे उपलब्ध आहेत- .बंदी घातली गेलेली  पुस्तकं नेट वर शोधली आणि डाउन लोड करुन वाचली- काही पुर्ण वाचली , तर काही नुसती चाळली त्यांचीच थोडी माहिती इथे देतोय. यातली काही पुस्तकं ही अश्लीलतेकडे झुकणारी, किंवा अश्लील म्हणता येतील अशी पण आहेत. पुस्तकांचा काळ हा अगदी १७ व्या शतका पासून तर १९ व्या शतका पर्यंत   आहे. त्या काळी पण असं साहित्य अस्तित्वात होतं हे बघून खरं तर आश्चर्यच वाटतं.
एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा काही दशका  पूर्वीचा दृष्टीकोन आणि आजचा दृष्टीकोन यामधे जमीन अस्मान चं अंतर आहे. मी लहान असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लील – चावट लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते.ह्यांची शामा ही कादंबरी बरीच गाजली होती. त्या  कादंबरी मधे काय होतं असं?? आजच्या तुलनेत अजिबात काही नव्हतं. थोडं रोमान्सचं वर्णन केलं गेलं होतं. त्या काळात या कादंबरी कडे एक श्रृंगारिक कादंबरी म्हणून बघितलं जायचं आणि आमच्या सारखे मुलं चोरुन वाचायचे . तेंव्हा नुस्तं नायकाने नायिकेला जवळ घेतलं, आणि तिचं चुंबन घेतलं, इतकं जरी वाचलं तरी  अंगावर शहारुन यायचं   :)   सगळ्यात जास्त इरॉटीक /रोमॅंटीक साहित्य होतं मराठी मधलं. आता नेटवर इतकं जास्त व्हिडिओ आणि अश्लील फोटो, लेख उपलब्ध आहेत, की काकोडकर एकदम फिके वाटतात, आणि त्यांच्यावर का केस केली गेली होती हेच समजत नाही??
काही महिन्यांपूर्वी एक रा.घो. कर्वेंवरचा चित्रपट पाहिला होता टिव्हीवर. त्या मधे दाखवलं आहे, की समाज स्वास्थ्य म्हणून जे मासिक ते काढायचे त्याला पण एक अश्लील साहित्य म्हणून त्यावर खटले भरण्यात आले होते.मराठी साहित्य इतके शुचिर्भूत होते, की सीमा रेषेला कधी  किंचितही स्पर्श झाला तरी लोकं अकांड तांडव करायचे. हा चित्रपट अतिशय सुंदर होता. संतती नियमां साठी त्यांनी केलेलं काम उत्कृष्ट रीत्या दाखवलं होतं. पदरचे पैसे खर्च करुन ते एक समाजस्वास्थ्य म्हणून  मासिक चालवायचे. अश्लिलतेच्या कायद्याखाली त्यांच्यावर बरेचदा खटले दाखल करण्यात आले . पैसा नसतांना पण त्यांनी हे मासिक सुरु ठेवलं.
केवळ भारतामधे नाही तर जगभरात असे अनेक साहित्य प्रकाशित केले गेले आणि त्या साहित्यिकांवर खटले पण चालवले गेले. काही ठिकाणी तर जेल मधे पण जावं लागलं साहित्यिकांना.
लेडी चॅटर्लीज लव्हर हे पुस्तक एवढ्यातच म्हणजे १९६० सालपर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं . या पुस्तकावर १८५७ चा ऑब्सिन पब्लिकेशन ऍक्ट खाली खटला भरण्यात आला होता. या पुस्तका मधे होतं तरी काय?? मी वाचलंय.. अजिबात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही मला.प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं.प्रेम हे शेवटी   शारिरीक पातळीवरच जाउन पोहोचतं असं लिहिलंय यामधे-.
हे पुस्तक मला तरी अतिशय उत्कटतेने लिहिलेली एका स्त्रीची अतृप्त भावनांची कहाणी वाटली. कॉनी चा नवरा लॉर्ड क्लिफोर्ड… एका युध्दामधे जातो- तो जातो तेंव्हा होणारा सेक्स्युअल भावनांचा कोंडमारा आणि ती वाट पहात असते तो परत येण्याची. तो जेंव्हा परत येतो तेंव्हा व्हिल चेअर वरच बसलेला!!  अजिबात  खालच्या शरीराची हालचाल करता येत नसते त्याला.
कॉनीच्या स्त्रीसुलभ आणि सेक्स्युअल  भावना  या सारख्या उफाळून येतात- त्यांची पूर्ती तर व्हायलाच हवी. नवऱ्यावर असलेलं प्रेम, त्याची  ’ती’ असमर्थता, त्यातुन आलेलं वैफल्य आणि त्या मुळे  उद्युक्त होणाऱ्या सेक्स्युअल  भावनांची  दमन करण्याचा प्रयत्न आणि नंतर मग   पूर्ती करण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर बरोबर केलेली शय्या सोबत -अशी सरळ धोपट कहाणी आहे.  कॉनी ही व्याभीचारी नाही- तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे अगदी मनापासून.. पण , परिस्थिती मुळे  ती  केवळ शरीरसूखा साठी  नवऱ्याच्या मॅने्जर बरोबर  लग्न बाह्य संबंध ठेवते.
जर तिचा नवरा व्हिल चेअर बाउंड झाला नसता, तर ती अशी वागली असती कां?? हा विचार बरेचदा वाचतांना मनात येतो..बऱ्याच लहान लहान प्रसंगातून अतिशय सुंदर रीतीने  तिचा मॅनेजर बरोबरचा रोमान्स रंगवला आहे.  डि एच लॉरेन्स यांचं हे पुस्तक लिहिलेलं हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचायलाच हवं .पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे  डीएच लॉरेन्सचं पुस्तक  असल्यामुळे !! आता हे पुस्तक म्हणजे श्रृंगारिक कादंबरीतला एक मानदंड ठरावा असे आहे . या पुस्तकातल्या नायिकेचा तिरस्कार करावा की तीची कीव करावी – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधताच हे पुस्तक संपत. एकदा आवर्जून वाचा..इथे लिंक दिलेली आहे डाउन लोड करायला.
स्त्री पुरुष संबंधाची उघडपणे  केली गेलेली वर्णने आपल्या देशात अगदी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. वात्सायनाचे कामसुत्र म्हंटलं की  फक्त ती ऍक्रोबॅटीक आसनंच आठवतात. पण खरंच तसं आहे का? कामसुत्रा मधे त्या व्यतिरिक्त खुप माहिती दिलेली आहे. आपण फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आपली मतं बनवतो- काम सुत्र म्हणजे ती चौर्यांशी आसनं इतकंच समजतो आपण पण तसं नाही. हे पुस्तक अतिशय सुंदर रितीने त्या काळातल्या वातावरणामधून वैवाहीक जिवन सुखी कसं असावं याची माहिती देणारं पुस्तक होतं.  ह्या पुस्तकामध्ये आदर्श वैवाहीक जीवन कसं असावं याची माहिती दिलेली आहे .स्त्री ला काय आवडतं? पुरुषाने कसे वागावे? असे अनेक मुद्दे आहेत दिलेले. दुर्दैवाने आजही इतक्या सुंदर ग्रंथाकडे भारतामधे एक पोर्नोग्राफिक पुस्तक म्हणून पाहिलं जातं.इथे वाचा ते पुस्तक.
हे पुस्तक खरं तर या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक ठरु शकतं . याच पुस्तकावरून बेतलेलं एक अरबी पुस्तक पण त्या काळी निघालं होतं त्याचं नाव होतं पर्फ्युम्ड गार्डन.वाचायचं असेल तर इथे आहे ते.. यावर जास्त काही लिहित नाही फक्त एकच आहे हे पुस्तक म्हणजे परस्त्रीला प्रेमात कसे पाडायचे याचे पाठ पढवतं.नवऱ्याच्या नकळत एखाद्या स्त्रीला प्रेमात कसं पाडायचं?? ( या अरबांची स्टाइल तेंव्हा पण तशीच होती. )मला वाटतं की पुस्तका पेक्षा फॅंटसी कडे वळणारे लेखन होते हे. १८५० च्या काळात अशी पुस्तकं छापण  म्हणजे ्खूपच धैर्याचं काम होतं. ही पु्स्तकं कामोत्तेजक   जरी नसलं, तरीही नैतीक मुल्यांना धक्का देणारं म्हणून हे पर्फ्युम्ड गार्डन तेंव्हा खुप गाजलं होतं. अशाच लेखनामुळे नैतीक अधःपतन होतं अशी कल्पना पण काही लॉर्डस लोकांनी हाउस ऑफ कॉमन्स मधे मांडून त्यावर बंदीची मागणी केली.पुढली बरीच वर्ष यावर बंदी घातली गेली होती .
सगळ्यात जास्त गाजलेलं पहिलं सेक्स बद्दल स्पष्ट पणे लिहिल्या गेलेलं एका वेश्येचं आत्मचरित्र म्हणजेच फॅनी हिल्स वुमन ऑफ प्लेझर!! १७४८ साली ही कादंबरी लिहिली गेली. जॉन क्विलंड हा लेखक होता या कादंबरीचा. अतिशय  धीट विषय, उत्कृष्ट हाताळणी, आणि भावना चेतवणारं लिखाण म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. फॅनी हिल्स म्हणजे आजकालची कहाणी फक्त लिहिल्या गेली १७४८ मधे.
एका गावाकडल्या मुलीला शहरात आणून कुंटणखान्यात आणून ठेवलं जातं. तिथे ती दररोजच  स्त्री पुरुष संबंध पहाते ,आणि नकळत त्या बद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण होतं तिच्या मनात.पुरुषाची भिती संपून जाते .एकदा भिती संपली की तिला असे संबंध हवे हवेसे वाटु लागतात.    अगदी जो कोणी पहिला पुरुष येइल त्याबरोबर किंवा कोणाही बरोबर शैय्या सोबत करायची मानसिक तयारी होते तिचे.. नंतर तिचं चार्ल्स वर प्रेम बसून त्याच्या  बरोबर पळून जाणं, चार्ल्सच्या वडिलांनी त्याला परदेशी पाठवून देणं.. आणि मग फॅनीचं केवळ स्वतःच्या सेक्स्युल निड्स पुर्ण करुन घेण्यासाठी  फुल फ्लेज्ड प्रॉस्टीट्य़ुशन -सुरु करणं आणि येन केन प्रकारेण …. जाउ द्या. .. पुस्तक वाचायचं असेल तर.. इथे आहे ते!  असं म्हणतात की त्या काळी स्त्रियांना लैगीक भावना फार दाखवणं अपेक्षित नव्हतं, कद्चित म्हणून एक स्त्री आपल्याला सेक्स आवडतो, आणि तो पुर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शैय्या सोबत करते.. ही गोष्टच सर्व मान्य नव्हती.  म्ह्णूनही असेल हे पुस्तक गाजलेलं.  इतकी वर्ष बंदी असलेलं पुस्तक म्हणुन एकदा तरी वाचावं म्हणून मी डाउन लोड केलं पण पुर्ण वाचलं नाही.. अर्धवट वाचून सोडून दिलं.
दसऱ्या महायुध्दाच्या काळात , कोणी वॉल्टर हे काल्पनीक  नांव घेउन  एक माणुस  आपला निरनिराळ्या  १००० स्त्रियांबरोबरच्या सेक्स्युअल संबंधाची कहाणी   लिहितो. माय सिक्रेट लाइफ या अतिशय पॉप्युलर पुस्तका मधे- आणि  ते पण ११ खंडामध .इस १८५७ च्या कालावधीमधे असे स्पष्ट लिहिले गेलेले हे एकुलते एक   अश्लील पुस्तक म्हणावे लागेल.  खुप पॉप्युलर पुस्तक होतं ते.हलकं फुलकं, किंचित तोचतोपणा असलेलं हे पुस्तक आहे..  अर्थात तुम्ही जर आजच्या अव्हेलेबल असलेल्या साहित्याबद्दल बोलाल, तर हे पुस्तक एकदम मिळमिळीत वाटण्याची शक्यता आहे पण १८५७ च्या काळात ह्या पुस्तकामुळे किती वादळ उठलं असेल ते तुम्ही समजू शकता.  हा वॉल्टर कोण होता ते कधिच समजलं नाही.या पुस्तकावर बऱ्याच देशात आणि खूप वर्ष बंदी होती.   (ऑब्सिन ऍक्ट च्या अंतर्गत बंदी ). ते पुस्तक इथे आहे. आजकालच्या अश्लिलतेच्या मानदंडापुढे हे पुस्तक एकदम फूसकं वाटू शकतं- आणि कंटाळवाणं तसेच रिपिटेटिव्ह नेचरच.
एक पुस्तक होतं. १२० डेज ऑफ सोडोम. सेक्स फॅंटसी वर वाहिलेलं हे पुस्तक अतिशय बिभत्स म्हणता येइल असं पुस्तकात होतं. मार्किस नावाच्या फ्रेंच लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक सॅडिझम वर लिहिलं होतं. हे पुस्तक वाचलं की  किळस वाटते वाचतांना. यावरच एक चित्रपट पण काढला गेला होता- याच नावाने. याची लिंक मला सापडली पण मुद्दामच इथे देत नाही. १७व्या शतकात फ्रान्स मधे एका निर्जन भागातल्या पॅलेसमधे सरदार लोकं खून, वासना, बिभत्सता वागणूक, यांचा जो खेळ खेळतात त्याचं वर्णन आहे या पुस्तकामधे. १६ कुमारीका, ८ तरुण, आणि काही स्त्रियांना एका ठिकाणी डांबून ठेवले जाते. हे सरदार चार वेश्यांकडुन त्यांचे अनुभव ऐकतात आणि त्यांची उजळणी या तरुणींवर केली जाते.या मधे छळाची वर्णनं आहेत केलेली की वाचतांना घृणा यावी. मी तर हे पुस्तक वाचूच शकलो नाही.शेवटी प्रत्येकाचाच खून केला जातो. यु ट्युब वर काही क्लिप्स आहेत या चित्रपटाच्या. शोधा, हव्या असतील तर- मी देणार नाही लिंक्स किंवा पुस्तकाची पिडीएफ लोकेशन..
हेन्री मिलर नावाचा एक लेखक होऊन गेला. त्याने १९४० मधे एक ट्रॉपिक ऑफ कन्सर ही कादंबरी लि्हीली.अमेरिकेत ऑल टाइम फर्स्ट ५० बेस्ट नॉव्हेल्स मधे पण हिचा समावेश केला गेला आहे.
याच सुमारास  डेल्टा ऑफ व्हिनस हा कथा संग्रह पण प्रकाशित करण्यात आला- लेखिका होती अनेस निन -मिलरची प्रेयसी!!!!. असं म्हणतात की प्रत्येक पान  लिहीण्यासाठी लेखकाला त्या काळी एक डॉलर देण्यात आला होता. अट एकच होती, कादंबरी मधे इतर वर्णन, ्निसर्ग वगैरे अजिबात नसावे , फक्त सेक्स आणि सेक्स यावरच ही कादंबरी असावी. १९६७ मधे पेंग्विनने प्रकाशित केलेली हा कथा संग्रह मजेशिर आहे.  या कथा संग्रहामुळे उत्तेजक लेखन करणारी पहिली लेखिका म्हणून तिला मान मिळाला.
त्या काळात जेंव्हा आपल्या भारता मधे आपण राघो कर्वेंवर खटला चालवत होतो, त्याच काळात जगात इतकं काही  होऊन गेलं होतं. काही बाबतीत मागासलेलं असणं  पण खूपच चांगलं असतं नाही??

गमतीशीर म्हणी..

परवा सुहासचा एक बझ पाहिला, त्यामधे त्याने काही चांगल्या म्हणी असतील तर सांगा म्हंटलं होतं.तो बझ पाहिला आणि काही जुन्या म्हणी आठवल्या.त्यातलीच एक म्हण तिथे लिहिली. ती म्हण आमच्या लहानपणी एक बाई भांडी घासायला यायची  तिच्या वापरा मधे होती. ही म्हण आणि अनेक  अशा अनेक म्हणींचा खजिना असायचा तिच्या पोतडीत.
माझी आज्जी माझे खूप लाड आणि कौतूक करायची. मी काहीही केले तरी आईच्या मारा पासून वाचवायची. तेंव्हा ती भांडेवाली बाई ” लाडका लेक मंदिरी हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे” अशी अस्सल इरसाल म्हण वापरायची. त्या तशा प्रसंगाला अगदी चपखल बसणारी. तेंव्हा मात्र त्या मावशीचा खूप राग यायचा- पण आज मात्र तिच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. श्लील- अश्लिलतेच्या मर्यादा ओळखून केलेल्या ह्या जुन्या म्हणी म्हणजे एक अमुल्य ठेवाच  आहे.
हा सगळा आपला पूर्वापार चालत आलेला भाषेचा ठेवा आता नामशेष होत चाललाय. बरेचदा तर शब्द चार चौघात बोलण्यासारखे नाहीत, म्हणून टाळल्या जातात. आपण साध्या साध्या वापरातल्या शब्दांकडे पण वाईट म्हणून बघतो.
बऱ्याचशा जुन्या गावाकडल्या  म्हणींच्या मधे काही म्हणी मधे तर बरेच श्लील -अश्लीलतेच्या मर्यादा रेषेवरचे  शब्द पण सर्रास वापरले गेलेले दिसतात. स्पष्टच बोलायचं तर  असभ्य समजले जाणारे, किंवा घाण समजले जाणारे शब्द विपुल प्रमाणात वापरले जातात . काही म्हणी तर पुर्ण म्हटल्या पण जात नाहीत, तर केवळ पहिला किंवा दुसरा अर्धा भागच वापरला जातो.अर्थात त्यात काही वावगं आहे असे नाही, पण पुर्ण म्हणी पण मजेशीर असतात. जसे नावडतीचे मीठ अळणी, हा अर्धा भाग नेहेमीच वापरला जातो, पण पुढचा अर्धा भाग आहे तो मात्र कधीच वापरला जात नाही. पुर्ण म्हण अशी आहे,  “नावडतीचे मीठ अळणी, आवडतीचा शेंबुड गोड”
तशीच ही पण एक म्हण बघा” नाचता ये‌इना अंगण वाकडं, स्वयंपाक येईना ओली लाकडं” या म्हणीतील पण फक्त पहिला अर्धा भाग वापरला जातो. तसेच ’येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नव्हे” ही म्हण पण त्याच प्रकारातली. नेहेमी अर्धवटच वापरली जाते त्यामुळे दुसरा भाग माहितीच नसतो.
म्हणी आणि  हे बऱ्याच वर्षा पुर्वी पासून चालत आलेले आहेत. एक पान भर एक्स्प्लेनेशन देउन जे होत नाही ते एका म्हणी मुळे होते. एक लहानशी म्हण बरंच काही न बोलता पण बोलून जाते.  भाषेचे सौंदर्य आहे म्हणी, अलंकारामध्ये असते. माझ्यासारख्या लोकांना जरी ते लिहिता येत नसलं तरीही वाचायला मात्र नक्कीच आवडतं.  . बहुतेक म्हणी या बोली भाषेत वर्षानुवर्ष ( कदाचित शेकडॊ वर्षापासून)  चालत आल्या आहेत.त्यातल्याच काही इथे लिहितोय.
उगाच काहीतरी कारण सांगायचं, म्हणजे वड्याचं तेल वांग्याला लावायचं असं कोणी केलं की त्या साठी ’ “पादऱ्याला  पावट्याचा आधार ” अशी म्हण वापरली जायची.  ही एक जुनी म्हण आहे  किती अर्थ पुर्ण आहे बघा, अजिबात काही सांगायची गरज नाही- ” अवघड जागचं दुखणं, आणि जावई डॉक्टर “. एका वाक्यात कितीतरी सांगून टाकलं – इतकं की अजून एक्प्लेनेशन द्यायची गरजच नाही.
एक म्हण आहे, ” कौतुकाची वरात, अन हागायला परात” या अशा खास  म्हणी पूर्वीच्या काळी नेहमीच्याच वापरात होत्या. एखाद्याचं कौतूक करायचं तर किती कराव?  बरेचदा एखाद्या माणसाला दुसऱ्याचे इतकी जास्त वर वर करण्याची सवय असते की दुसऱ्या पाहणाऱ्याला ती ’चमचेगीरी’ करतोय अशी वाटते. लहानशा म्हणी नुसार सगळी परिस्थिती कशी स्पष्ट होते पहा.
तशीच ही एक म्हण पहा, ” कावळा गेला उडून, गू खा चाटून”. पुर्वी वाळण टाकलं की कावळे उडवायला तिथे कोणाला तरी बसावं लागायचं. समजा एखाद्या वेळेस काही कामा निमित्त त्या व्यक्तीला उठून जावं लागलं आणि तेवढ्यात जर कावळे सगळं वाळण घेउन उडून गेले तर काहीच शिल्लक रहात नाही. हा झाला शब्द्शः अर्थ, आता व्यावहारिक अर्थ काय आहे ते सांगायची गरज वाटत नाही. इंग्रजी मधे एक म्हण आहे बोन्स  फॉर लेट कमर्स !
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून परवाच्या भाषणात एक म्हण वापरली होती, “शेण आपण खायचं, आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायच” . अर्थात अशा म्हणी वापरल्या की सरळ टाळ्या पडणारच भाषणात! तसंही एक आहे दोन्ही ठाकरे बंधू अगदी खास शेलक्या म्हणी शोधून वापरतात त्यांच्या भाषणांमधून – हा वारसाहक्काने मिळालेला ठेवा आहे त्यांना बहूतेक!
बरं सगळ्याच म्हणी काही अशा वाईट शब्दांच्या ( त्यांना वाईट कशाला म्हणायचं? साधे सोपे सामान्य शब्द आहेत ते)  असतात असेही नाही तर कधी कधी अगदी साधे शब्द वापरले  तरीही  सामाजिक जिवनाचे वास्तव म्हणून ” काळी बेंद्री  एकाची, सुंदर बायको लोकांची” अशी म्हण पण वाचायला मिळते.
एक म्हण  एका मायबोलीकराने वापरली होती ती मायबोलीवर वाचली होती ” नको तिथे बोटं घालू नये, आणि घातली तर वास घेत बसू नये” हसून हसून पुरेवाट झाली होती वाचल्यावर. एका लहानशा म्हणीमधे किती मोठा आशय आहे नाही?
“घरची म्हणते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा” ही म्हण किंवा घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे ह्या दोन्ही म्हणी जवळपास एकाच अर्थाच्या पण एका म्हणीच्या ठिकाणी दुसरी वापरलेली चालत नाही. योग्य त्या वेळी योग्य ती म्हण वापरणे या मधेच खरी कला आहे.
बरेचदा अशक्य गोष्टींची अपेक्षा केली जाते. कितीही महत्वाचे काम असले म्हणून काय झाले?  नाही होणार सांगायची ही एक पद्धत पहा, तुम्ही कितीही सांगाल हो, काम झालंच पाहिजे म्हणून, पण “जावई पाहुणा म्हणून आला, तर रेडा दूध देईल काय?”
काही लोकं  जे अगदी ऑफिसमधे साहेब लोकांची चमचेगिरी करतात त्यांच्या साठी एक म्हण आहे, ’ साहेबाने रेड्याचे दुध काढ म्हंटले, तर तो चरवी ( भांडं) कुठे आहे म्हणून विचारतो’ . ही म्हण तर  मी पण बरेचदा वापरतो.
एखाद्या मोठ्या माणसाचा लहानसा सेवक पण खूप मान मरातब मिळवतो. उदाहरणार्थ, जसे आमिरखानचा ड्रायव्हर पण आमिरखानचा पर्सनल अ‍ॅडव्हायझर असल्यासारखा वागत असतो. अशाच प्रकारच्या प्रसंगांसाठी ” थोराघरचे श्वान,त्याला देती सर्व मान” ही म्हण अगदी पर्फेक्ट बसते.(आमिरखान नाव फक्त काहीतरी वापरायचं म्हणून वापरलंय.)
खूप खूप लक्ष द्यायचं, पण …. जाऊ द्या, एक म्हण , जी स्वतःच सगळं स्पष्ट करते – ” दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा, अन मोरीला बोळा घालायचा” मला ही म्हण पण खूप आवडते. ’ताका पुरते रामायण’ किंवा साधारण तशीच “नागोबा  म्हसोबा पैशाला दोन, पंचमी झाली की पुजतय कोण?” या एकाच अर्थाच्या म्हणी आहेत.एक नेहेमीच्या वापरातील, आणि एक विस्मृतीत गेलेली.
नवरा बायको, जावई सासरचे लोकं, सासू सून , या सगळ्या नात्यांचे वेगवेगळे पदर उघडले जातात या म्हणींच्या मधून.  अशा अनेक म्हणी आपल्या मराठी मधे आहेत.   ही एक गमतीशीर म्हण बघा ” भोळी ग बाई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला पुरणपोळी” किंवा ही “मी नाही त्यातली कडी लावा आतली”अशा द्वैअर्थी म्हणी पण आहेत बर्याच आहेत. या सारख्या अनेक म्हणी आहेत. पण  सगळ्यांच्या बद्दल लिहित बसलो तर एक ग्रंथच होईल, म्हणून थांबतो इथे.
थोडं शोधलं , तर नेट वर एक सुंदर साईट दिसली म्हणीं साठी खास वाहिलेली. त्या साईटवर अशा ९०० च्या वर म्हणी आहेत.अवश्य भेट द्या.

आई शपथ!!

लहान असतांना ” खोटी शप्पत घेऊ नकोस, नाही तर आई मरते “  अशी भिती घालून शपथ या गोष्टी बद्दल एक अकारण उत्सुकता, भिती मनात घातली जात असे. कितीही निगरगट्ट मुलगा असला, तरी पण आईची शपथ  घेतांना थोडा काळजीपूर्वकच घ्यायचा. पण एकदा का कोणी  आईची शपथ  घेतली की त्यावर सगळे जण अगदी डोळॆ बंद करून विश्वास ठेवायचे.
खालच्या पोर्च मधे दोन मुलं खेळत होती, आणि मां की कसम ले, फिर मानूंगा असं काहीतरी बोलणं सुरु होतं. ते ऐकलं, आणि जाणवलं, की आपल्या लहानपणीच्या व्हॅल्युज अजूनही तशाच आहेत.  इतक्या वर्षानंतर सुद्धा या कम्प्युटरच्या युगात पण आईच्या शपथेचं तितकंच मह्त्त्व आहे हे बघून गम्मत वाटली.  लहानपणी खोटं बोलायचं असेल तर ’आई शपथ’   टाळून इतर कुणाची तरी म्हणजे ” देवाची शप्पत” घेउन वेळ मारून न्यायचो आम्ही. देवाची शपथ ही आईच्या शपथे इतकी पॉवरबाज मानली जात नसे.
मला आठवतं, आमच्या लहानपणी पण घरचे चिल्लर  पैसे कधी दिसेनासे झाले, की आई ” तू घेतले नाहीस ना? मग घे माझी शपथ”, म्हणून शपथ घ्यायला लावायची . त्यातले जर पतंगी साठी पाच पैसे जरी घेतले असले, तरीही खोटी शपथ कधी घेऊ शकलो नाही  . आपल्याला शिक्षा होणार हे माहीती असून सुद्धा मान्य करायचो की मीच घेतले पैसे म्हणून -. कदाचित म्हणूनच असेल की आता मोठं झाल्यावर पण   खोटी शपथ घेतल्याने   काही होत नाही हे समजल्यावर सुद्धा,   आईची खोटी शपथ घेण्याची अजिबात इच्छा / हिम्मत होत नाही.
लग्न झाल्यावर  बायको जेंव्हा आईच्या जागी असते, आणि घरून भांडून बाहेर गेल्यावर ” डबा  संपव रे, माझी शपथ आहे तुला, असं म्हणते,आणि जो पर्यंत हो म्हणत नाही तो पर्यंत फोन ठेवत नाही तेंव्हा या एका शब्दाच्या मधल्या शक्तीची जाणीव होते. केवळ एक शब्द , ’तिची शपथ’ तुम्ही घेतली की ती निश्चिंत होते, की आता हा नक्की डबा संपवणार म्हणून. दुपारच्या लंच टाइम मधे   बायकोचा चेहेरा डॊळ्यासमोर येतो आणि म्हणतो, माझी शपथ आहे तूला, तेंव्हा आपसूकच डबा उघडून खाणं सुरु केलं जातं.
लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जातांना पण डोळ्यात पाणी आणून, मी लग्गेच परत येते रे, तुझी शप्पत, असं म्हणत,  जेंव्हा ती निघते, तेंव्हा रोज न चुकता दिवसातून चार दा फोन करीन म्हणून शपथ घ्यायला  लावते, तेंव्हाच तिचा तो चेहेरा आणि भरलेले डॊळॆ आयुष्यभर  लक्षात रहातात,शपथ मोडता येत नाही हा म्हणजे   एक मनाचा खेळ आहे झालं!
जर एखाद्याची शपथ मोडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यु होत असेल तर मग, मी कसाबची खोटी शपथ घेतली असती ! सहज विचार केला की जर अजुन कोणी कोणाची शपथ घेतली असती बरं???
काही लोकांनी आपल्या बॉसची ,
मनमोहनने  जनरल कयानीची,
शरदपवारांनी अण्णा हजारेंची ,
तेलगी ने शरद पवारांची ,
विलासरावांनी पृथ्वीराजांची.
जया बच्चन ने रेखाची,
शाहीद कपूर ने करीनाची,
उद्धव ने राजची,
सलमानने तर  अगदी ऐश्वर्या पासून विवेक , ते कतरिना, ते रणवीर वगैरे वगैरे.. शपथा घेतल्या असत्या.भुजबळांनी, राणेंनी , आणि मुंडेंनी कोणाची घेतली असती ते तुम्हीच ठरवा. अर्थातच, ही यादी खूप मोठी होऊ शकते.   पण खोटी शपथ घेतल्याने कोणी मरत नाही म्हणून बऱ्याच लोकांचा जीव वाचला असे  म्हणावं लागेल.
जगात तुम्ही कुठल्याही भागात गेलात तरी, ह्या शपथेचे महत्त्व अगदी सारखे आहे अगदी अमेरिकेपासून तर टीम्बक्टू पर्यंत!  शपथ, वचन, आणि पाप पुण्य ह्या कल्पना मला नेहेमीच गोंधळात टाकतात.
शपथेवर माझा अजिबात विश्वास नाही, पण आमचं न्यायालय मात्र अगदी डोळे झाकून विश्वास ठेवते. कोणीही असो, अगदी तो कसाब जरी असला, आणि त्याने शपथेवर  कुराणावर हात ठेवून खोटं सांगितलं की तो हल्ला करणारा मी नव्हेच.. तरी पण आपली न्याय व्यवस्था  तो खोटं बोलला हे माहीत असूनही त्याला काही करणार नाही, उलट त्याच्यावर केस लढवत बसते वर्षानुवर्ष- कारण कायद्यामधे तशी तरतूद नाही.
शपथ घेऊन खोटं बोललं तरी  न्यायदेवतेसमोर चालतं. तिथे बोलतांना   खोटी का होईन ती गीतेवर, कुराणावर हात ठेवून  समोर शपथ घ्यायची , की झालं. शपथे सारखी  एखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना पण त्यावर न्यायालय विश्वास  का बरं ठेवते? हा प्रश्न नेहेमीच पडतो. किती मजेशीर आहे ही गोष्ट नाही??
लग्नामधे पण होम सुरु असतांना ’ नाती चरामी अहं” अशी शपथ घ्यावी लागतेच- किती लोकं ती पाळतात हा प्रश्न आहेच म्हणा!   सचीन तेंडूलकर पण सारखा आईशपथ म्हणतच असतो. हे राजकीय नेते जेंव्हा एखाद्या पदाची शपथ घेतात तेंव्हा त्यांना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते.  अशी शपथ घेतली की मग “आदर्श” सारखी कामं केली जाऊ शकतात. कोणाला काही सांगायची गरज नाही- कारण शपथ घेतली आहे ना गोपनीयतेची!
शपथ म्हणजे एक खेळ आहे, असा खेळ जो ’खेळ’ तुमच्या भावनांशी खेळतो आणि तुमच्या मनावर तुमच्या नकळत राज्य करतो!! गाडी खाली चालणारा कुत्र्याला असे वाटते, की गाडी आपणच खेचतोय.. तसंच तुम्हाला वाटत असतं की हा खेळ आपण खेळतोय, पण प्रत्यक्षात तो खेळच तुमच्या मनाशी खेळत असतो…….!

मटाबाबा डॉट कॉम

ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि  मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा  ऐकल्यावर.   देशीबाबा  च्या रांगेत नेऊन बसवलं होतं त्याने मटाला.
आजकाल ह्या वर्तमान पत्रांची पातळी इतकी    खालावली आहे की सगळ्यांसमोर हा पेपर नेट वर उघडून वाचणे पण कठीण झाले आहे . एके काळी गोविंदराव तळवलकर,  कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, पुलं देशपांडे सारख्या  मातब्बर लेखकांच्या लेखांनी नटलेला दर्जेदार पेपर   होता मटा. आज त्याची जी विपन्नावस्था झालेली आहे , ती बघून वाईट वाटते.  पेपरची अशी दुर्दशा होण्याचे कारण काय ते काही समजत नाही. चांगले लेखक नाहीत?  की अजून  दुसरं काही??
टीआरपी साठी ज्या प्रमाणे इंडिया टीव्हीवर बातम्या दाखवल्या जातात , त्याच प्रमाणे पेपर मधे पण टीआरपी साठी काय वाटेल ते छापण्याची पद्धत सुरु झाली  आहे.  यलो जर्नॅलिझम म्हंटलं तरी  हरकत नाही याला.  सेक्स, नग्न स्त्रिया, असं काहीतरी छापलं  की लोकं धावत येतात पहायला. पेज हिट्स वाढले की झाले. चांगलं लिहून  पेज हिट्स  वाढवण्यापेक्षा हे  सोपं अहे.बस्स!!
ऑन लाइन पेपर उघडल्यावर पेपर वाचता वाचता   पेपरवर असलेल्या बऱ्याच लिंक्स पैकी एखाद्या लिंक वर क्लिक केल्यावर  जर डोळ्यासमोर एकदम नग्न स्त्री चा फोटो आला, आणि तेवढ्यात शेजारी कोणी आलं   तर तुम्ही काय कराल?   एकदा मी लंच टाइम मधे  मटा वाचत होतो, बहुतेक कुठेतरी क्लिक झाले असावे, आणि समोर एकदम एक स्त्रीचा अर्धनग्न फोटो आला. शेजारच्या क्युबिकल मधल्याने पाहिले तर नाही? म्हणून एकदम मागे वळून पाहिले. कसं तरी करून पेपर चे ते पेज बंद केले. तो पेपर होता अर्थात मटाबाबा.  तो फोटो जेंव्हा एकदम समोर आला तेंव्हा   बसलेल्या  धक्क्यातून  मी लवकर सावरू शकलो  नाही.
एखाद्या विवाहित   स्त्रीने योनी शुचिता सांभाळावी अशी अपेक्षा असते. वेश्ये मधे आणि घरंदाज स्त्री मधे फक्त तेवढाच फरक असतो.  त्याच प्रमाणे पेपरने पण एक स्टॅंडर्ड मेंटेन करावं अशी अपेक्षा असते.  काय छापावे काय छापू नये यावर स्वतःचे स्वतःच नियंत्रण ठेवायला हवे .  नाहीतर मस्तरामच्या पुस्तका मधे आणि पेपर मधे काय फरक शिल्लक राहील? पेपरवर हल्ली सेन्सॉरशिप नाही.  पण आजकाल पेपर वाल्यांनी  जर  सामाजिक बांधिलकीची जाणीव सोडून, कंबरेचे गुंडाळून डोक्याला बांधलेले  पाहिले  की मग मात्र सेन्सॉरशिपची खरंच  आवश्यकता आहे असे वाटायला लागते.
महाराष्ट्र टाइम्स  बद्दल  एकेकाळी एकप्रकारचा आदर होता. मी लहान असतांना नागपूरला मटा दुसऱ्या दिवशी मिळायचा, तरीही  आमच्या घरी घेतला जायचा कारण उच्च दर्जाचे लेख. उशीरा मिळाले तरी पण वडिलांना खूप आवडायचा. तसं म्हटलं तर मटाचं आणि माझं वय एकच! अगदी लहानपणापासून हा पेपर मी बघत आलो आहे. अगदी लहान असतांना पासून आयफल टॉवर वाचायला आवडायचे.   एकेकाळच्या इतक्या चांगल्या पेपरची सध्या  जी दयनीय   अवस्था झालेली आहे ती पाहून वाईट वाटतं.   वाचक मिळावे म्हणून चांगले वैचारिक लेख लिहण्यापेक्षा चक्क    पोर्नोग्राफी   आधार घ्यावा लागतो या पेपरला, ही कल्पनाच सहन होत नाही.
पेपर हा घरातल्या सगळ्यांनी वाचायचा असतो.  घरच्या कॉम्प्युटर वर मराठी पेपर वाचणारी   मुलं आहेत. मटा ची ऑन लाइन एडीशन म्हणजे एखाद्या पोर्नोग्राफी साईटला लाजवेल अशी आहे. काय छापावं- आणि काय नाही ,नग्नता किती प्रमाणात दाखवावी,याचा विधिनिषेध न बाळगता, चीप, व्हल्गर, आणि सेक्स ने परिपूर्ण असलेले काही फोटो तरी  पेज हिट्स वाढवायला छापायचे – असे प्रकार मटा ने सुरु केलेले आहेत.
२१ तारखेच्या मटा मधे सिलेब्रेशनच्या   नावाखाली जे काही फोटो मटा ने दिलेले आहेत ते सगळ्यांसमोर पहाण्याच्या लायकीचे नाहीत.   फोटोमधे काय दाखवले आहे हे सुद्धा इथे लिहीण्याची मला लाज वाटते, त्या साठी ही लिंक पहा असे फोटो छापण्यासाठी निर्लज्ज पणा  लागतो . इतका निर्लज्ज पणा अंगी मुरवायला पण खरंच गेंड्याची कातडी लागते,  वर सिलेब्रे्शन मधे दिलेल्या फोटो मुळेच हा लेख  लिहायला घेतला.   माझ्या तर्फे नो कॉमेंट्स!!
एका लेडी कॉन्स्टेबलच्या पार्श्वभागाचे छायाचित्र या पेपरने वेब मसाला मधे छापले होते.
बरं हे झालं ते  फोटो बद्दल. मटा वरचे लेख आजकाल कसे असतात हे सांगायची गरज नाही. अशुद्ध भाषा, जागोजागी इंग्रजी शब्दांचा केलेला विनाकारण वापर, वगैरे वगैरे.. शुद्धलेखन कशाला म्हणतात हे बहुतेक विसरले असावे मटा वाले. मुद्रितशोधन पण केले जाते की नाही याची  पण मला शंकाच आहे .
भाषा इतकी  अशुद्ध / चुकीची वापरलेली असते, की वाचतांना भातामधे खडे लागावे तसे ते   शब्द  वाचून अडखळायला होतं .  थोडी फार चूक एखाद्या ब्लॉगरची झाली तर समजल्या जाऊ  शकते, पण चक्क राष्ट्रीय दर्जाच्या  पेपर मधे पण चुका अजिबात क्षम्य नाहीत.
चांगले लेख न लिहिणे, चांगली भाषा “ न वापरणे “ , सेक्सी चित्र देणं, झणझणीत वेब मसाला   म्हणून पोर्नोग्राफी च्याही थोबाडीत मारेल असे फोटो लेख, फोटो छापणं, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि आम्ही असेच  करणार,  हे  यांचे ( मटाचे) ब्रिद  आहे की काय असा संशय येतोय हल्ली.
आमची निवड मधे( लिंक इथे आहे) हे लोकं अक्षरशः सिंगल/डबल एक्स रेटींगचे फोटो देतात. आणि वर शीर्षक काय तर म्हणे “आमची निवड’- वाह! क्या बात है.कपाळावर हात मारून घ्यावासा वाटतो. पेपर हा   १३ वर्षाचा मुलगा ते ८० वर्षाचे आजोबा कोणीही वाचतो-.  त्या मुळे जे काही असेल ते सगळ्यांना पहाता येण्यासारखे,  वाचता येण्यासारखे  असावे असे वाटते. ज्याला पोर्नोग्राफी पहायची आहे त्यांच्यासाठी अनेक साईट्स आहेत नेट वर.
काही दिवसा पूर्वी  हेरंब ओक ने  एक बझ सुरु केला  होता. त्यावर दररोजच्या मटा मधल्या चुका लिहिल्या जात होत्या.  त्या चुकांच्या बद्दल   इथे लिहायला जागा पण पुरणार नाही, म्हणून इथे त्या बझची लिंक देतो आहे. हा  बझ नक्की पहा   . बझ पहाण्यासाठी तुम्हाला फक्त जी मेल वर लॉग इन करावे लागेल, आणि नंतर मग लिंक उघडेल. एखाद्या राष्ट्रिय पातळीवरच्या एखाद्या वृत्तपत्राला स्वतःच्या लिखाणाच्या क्वॉलिटी बद्दल काही खात्री नसल्याने   पेज हिट्स साठी अशा प्रकारचे फोटॊ पोस्ट करावे लागत असावे, या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असेल ?
’मटाबाबा डॉट कॉम’  चा पुन्हा लवकरच ’मटा, पत्र नव्हे मित्र ’व्हावा या अपेक्षेत  असलेला एक मटा वाचक………
सकाळ पण काही या बाबतीत मागे नाही. तुम्हाला स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे का? मग सकाळमधे लेख लिहा.
नेट वरच्या सकाळ मधे आलेल्या लेखावरच्या कॉमेंट्स लेखकाचा पुरेपूर अपमान करणाऱ्या असतात. कॉमेंट्स साठी पण मॉडरेशन आहे, तरीही मुद्दाम मॉडरेट करुन  लेखकाचा अपमान करणाऱ्या कॉमेंट्स पब्लिश करण्यामधे सकाळचा कोणीच हात धरू शकत नाही.
मी मान्य करतो, की त्या कॉमेंट्स बरेचदा लेखापेक्षा पण जास्त करमणूक करतात. मला पण वाचायला आवडतात. पण  एखाद्याने आपला लेख सकाळ कडे छापायला पाठवला की त्याचा अर्थ हा नाही की लेखकाने सकाळच्या साईट वर स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी लेख छापण्यासाठी सकाळला परवानगी दिलेली आहे.
आजकाल तर सकाळच्या प्रत्येकच पानावर ऍड्स लावलेल्या आहेत. कुठेही क्लिक केले की बाजूला जाहिरात उघडते. पैसे कमावण्यासाठी इतक्या लो लेव्हलला जाण्याची खरंच काही गरज नाही.प्राजक्ता पटवर्धनची एक सुंदर कविता पण या सकाळने सोडली नाही. त्यावर पण एकफालतू कॉमेंट दिलीच. अशा कॉमेंट्स साठी सोशल साईट्स आहेत. सकाळने ती कॉमेंट पब्लिश केली नसती तरीही चालले असते.पण कॉंट्रोव्हर्सी सुरु करून पेज हिट्स वाढवणे  हा मुख्य  उद्देश असतो.
मुक्तपीठ हे तर सर्वसामान्य लोकांचे लेख छापण्यासाठी सुरु केले होते. पण हल्ली काय होतं मुक्तपीठ?? मुपी वर लेख लिहिणारे सर्वसामान्य लोकं असतात, कधी पेपर मधे नांव वगैरे छापून न आलेले- आणि  लिहिण्याची सवय नसलेले, नॉन प्रोफेशनल रायटर्स. एखाद्या वेळेस पेपर मधे नांव आलं, की उगाच आनंद होतो.   आपण खूप काही मिळवलं असं वाटतं. एखादा लेख आला की ताबडतोब त्या लेखावर कॉमेंट्स चा मारा सुरु होतो.लेखकाने जर पुन्हा येऊन कॉमेंट्स पाहिल्या , तर त्याला इतकं वाईट वाटावं की आपण झक मारली आणि सकाळला लेख छापायची परवानगी दिली.मुक्तपीठ हे  नवोदिताना संधी देण्यासाठी नाही तर त्यांचा अपमान करण्यासाठी सुरु केले आहे का हा प्रश्न नेहेमीच पडतो मला!
इतरही पेपर मधे अशा प्रकारचे लेख असतातच, पण त्यावर अशा सकाळ प्रमाणे अपमान करणाऱ्या  कॉमेंट्स पब्लिश  करून लेखकाचा अपमान केला जात नाही.
हे असे चीप प्रकार सकाळ मधे नेहेमीच सुरु असतात. लेखकाची हुर्यो उडवा, अपमान करा, कशाही कॉमेंट्स पब्लिश करा,म्हणजे लोकं पुन्हा पुन्हा त्या कॉमेंट्स   वाचायला येतात . सकाळचा संपादकीय विभाग पण मुद्दाम  अशा कॉमेंट्स अप्रुव्ह करतो यावरून त्यांची पेज हिट्स वाढवायची ही स्ट्रॅटेजी आहे हे लक्षात येते. कॉमेंट मॉडरेशन एनेबल केलेले आहे, प्रत्येक कॉमेंट नीट तपासून मग नंतरच प्रसिद्ध  केली जाते.  मला वाटत की कॉमॆंट लेखकाची अपमान करणारी असेल तरच फक्त प्रसिद्ध केली जावी असा नियम आहे .सगळा संपादकीय विभागच या अशा खेळात मग्न आहे. टी आर पी , पेज हीट्स वाढवण्यासाठी अगदी  मुख्य बातम्यांवर पण अशाच चीप कॉमेंट्स प्रसिद्ध केल्या जातात.
सकाळची ही  मनोवृत्ती बदलली पाहिजे नाहीतर एक चीप थर्ड  रेट पेपर पेक्षा जास्त काही किम्मत रहाणार नाही या पेपरला – कमीत कमी माझ्या नजरेत तरी.

वात्रट मुलाची कथा..

एक तरूण आणि एक तरूणी.
दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर शिकणारा,   दिसायला पण ठीक ठाक- म्हणजे सलमान सारखी बॉडी नाही, किंवा शाहरुख सारखा प्रेझेन्स नाही, तरी पण सगळ्या गृप मधे सगळ्यांच्याच  जवळचा जीवभावाचा सखा .
इतकं जरी असलं, तरीही ’ती’ म्हणजे एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याची मुलगी, पैसा वगैरे खूप  नाही, पण अगदी कमी पण नाही.जे मागितलं ते बाबा आणून देतात, पैशाची कमतरता म्हणजे काय ते माहिती नाही त्याच्या पासून फटकूनच वागते.
त्याची आणि तिची नेहेमीच एकमेकांची टांग खेचणं सुरु असतं. त्याला ती आवडते, तिला पण तो (बहुतेक) आवडतो, पण ती मात्र ही गोष्ट  मान्य करत नाही कधीच.कदाचित त्याची लेडी किलर म्हणून प्रसिद्धी असेल की ती नेहेमी दूर रहायचा प्रयत्न करते त्याच्या पासून.ट्रेकिंग  गृप मधे बरेचदा बरोबर ट्रेक केलेला. तेंव्हा तिच्या लक्षात आलं की तो तिच्यावर फिदा आहे, पण तिने मात्र त्याला स्वतःच्या मनात काय आहे याचा ताकास तूर लागु दिलेला नाही.
दोघेही नेहेमीच एकत्र भेटत असतात, कोणी समोर नसलं ,की त्या दोघांची नोंक झोंक सुरु असते.  .दोघांनाही माहिती आहे  का- हो कदाचित असावं,  की दे लव्ह इच अदर .. बट डोन्ट वॉंट टू ऍग्री.
प्रसंग -१
ती एकटीच बसलेली आहे कॅफेटेरियात, मित्र मैत्रिणींची वाट पहात. ऑफ पिरियड मधे आज इतर मुलं सुटलेले प्रॅक्टीकल करायला गेले होते, पण तिला काहीच काम नव्हतं. तो समोरून येतो. समोरासमोर आल्यावर एकमेकांना विश करणे आलेच. ती च्या चेहेऱ्यावर हसू आलं- पण क्षणभरच!! त्याने एकदम काळजीयुक्त चेहेरा केला होता आणि एकदम आश्चर्याने तिच्या कडे पाहिले.
आता मात्र ती थोडी गोंधळली. काय झालं असेल? का म्हणून असा पहातोय विचित्र नजरेने?  ती स्वतः बद्दल उगाच कॉन्शस झाली. नजरेनेच विचारले?
तो म्हणाला, तुझ्या केसात काही तरी अडकलय.. थांब जरा… आणि त्याने हाताने तिच्या केसावरून हात फिरवला- तिच्या लक्षात आला त्याचा वात्रटपणा. तिला हसू आलं आणि त्याचा कावा लक्षात  आला, पण   तेवढ्यात त्याने आपला ’कार्यभाग ’ साधला होता.
त्याने पटकन हात समोर केला, आणि म्हणाला, दे शंभर रुपये?
कसले?
तुझे केस स्वच्छ करण्याचे. तुला काय वाटले ही  अशी लोकांना स्वच्छ करण्याची  सगळी घाणेरडी कामं मी  काय फुकट करतो की काय? चांगला इंजिनिअर आहे, सगळ्यांकडून तर पाचशे रुपये घेतो स्वच्छ करण्याचे, तू मैत्रीण म्हणून शंभरच मागितले..
तिचा चेहेरा रागाने लालबुंद झाला,
ती आता रिऍक्ट करणार तेवढ्यातच त्याने तिला म्हंटले, बरं ते जाऊ दे, तु इतकी सुंदर आहेस म्हणुन , आणि एक स्टूडंट आहेस म्हणून,  चल तुला   सूट देतो, फक्त एक वडा पाव -पेप्सी  मागव.. सोडले शंभर रुपये तुझे . इतका इंजिनिअर झाडूवाला मिळतो का इतक्या कमी किमतीत?
ती लाजली, आणि त्याला मारायला धावली, समोरच्या टेबलवरचा ग्लास पडला पाणी सांडलं पण तिकडे लक्ष नव्हतं दोघांचंही.  पुस्तकं  भिजताहेत. नशीब, तेवढ्यात इतर मित्र मंडळी पण आली, आणि दोघेही हसत सुटले.
प्रसंग २:-
तो बसलाय मित्रांसोबत गप्पा मारत. ती अजून आलेली नाही. विषय आहे, की मुली लॉजिकली विचार करतात की इमोशनली. त्याचं म्हणणं होतं की त्या लॉजिकली विचार करुच शकत नाहीत. त्यांच्या मेंदूमधला इमोशनल कोष कोणी  हळूवार पणे  स्पर्श केला तर त्यांचं लॉजिक पुर्ण पणे वाहून जातं . अगदी साधारण दिसणाऱ्या मुलाच्या प्रेमात एखादी सुंदर मुलगी पडलेली पाहिली की हा प्रश्न नेहेमीच पडतो – की तिने काय पाहिलं असेल ह्या माणसात?  ही कॉमेंट तर बरेचदा ऐकू येते अशा परिस्थितीत-” बंदर के हाथ मे अद्रक”!! :)
त्याचं हे नक्की प्रिन्सिपल होतं की मुली प्रेमात पडतात ते आपोआप, त्यांच्या इच्छे विरुद्ध! सगळं काही आपोआप होत असतं . ठरवून काही प्रेम होत नसतं हे मात्र नक्की. एखाद्या मुलीने लॉजिकली विचार करुन कितीही टाळलं तरीही इमोशनल माईंड चा कॉर्ड जर स्पर्शला गेला असेल तर … नो वन कॅन स्टॉप इट!!
गृप मधल्या मुलींचं म्हणणं होतं की आजकाल सगळ्या सुशिक्षित आहेत, म्हणून अर्थातच लॉजिकली विचार करतात.  बराच वेळ अशीच चर्चा सुरु होती आणि लवकरच सगळे निघून गेले पिरियडला.
प्रसंग -३
पुन्हा कॅंटीन. ती एकटीच बसलेली आहे. तो समोरून येतो. परवाची त्याच्यामुळे झालेली एम्ब्रॅसमेंट ती विसरलेली नव्हती. तिने त्याच्याकडे अगदी अनोळखी नजरेने पाहिले.
हाय!  कसली क्युट दिसते आहेस गं तू? पण जाम भिती वाटते बरं का मला अशा सुंदर मुलींची.
तिला खूप बरं वाटलं, कोणी सौंदर्याची  तारीफ केली की बरं वाटतंच ना.तिच्या चेहेऱ्यावर पुन्हा एक मोठं प्रश्न चिन्ह!! हातातल्या सेल फोनशी चाळा करत बसली होती ती.
बोलायचं नाही हे ठरवलं होतं, पण रहावलं नाही.. शेवटी ती म्हणालीच- कां बर? कसली भिती वाटते?
त्याचं उत्तर अनपेक्षित होतं, सगळ्या सुंदर मुली बिनडॊक असतात, आणि ते त्यांना पक्कं माहिती असतं, म्हणून तो ’मेंदूचा रिकामापणा’   त्या आपल्या सौंदर्याने झा्कून टाकण्याचा प्रयत्न करतात.
आता मात्र ती खूप चिडली होती. स्वतःला समजतो तरी काय हा? इतकी स्वतःबद्दलची घमेंड आहे तर कशाला येतो नेहेमी बोलायला, म्हणे सुंदर मुली बिनडोक असतात. मूर्ख कुठला. याला काही समजतं का? नेहेमी निळ्या जिन्सवर हिरवा शर्ट घालणारा बावळट माणूस !! बस्स इतक्याच शिव्या येत असतात तिला.. स्वतःचाच संताप येतो. धड शिव्या पण देता येत नाहीत आपल्याला ?? काय आयुष्य आहे आपलं?
’ती म्हणाली गेट लॉस्ट .. मला अजिबात बोलायचे नाही तुझ्याशी’.
’तू नेहेमीच अशी रुड बोलत असते का लोकांशी? लहानपणापासून तुला कोणी शिकवलेलं नाही वाटतं की लोकांशी कसं बोलावं ते”
’एक्सक्युज मी… काय म्हणालास??’
’सॉरी ..तू यु आर नॉट ऑफ माय टाइप’.
’गेट लॉस्ट.. आय डॊन्ट लाइक यु, ओव्हरस्मार्ट रॅट.’.
’मला माहिती आहे मुली नेहेमीच जर त्यांच्या मनात नाही असेल तर  हो  आणि हो असेल तर नाही  म्हणतात.’ हे असं नेहेमीच होतं मला माहिती आहे,तुला माझ्यामधे इंट्रेस्ट आहे म्हणून.
तिचा संताप शिगेला पोहोचला होता. काय करावे सुचत नव्हते. रागाने लाल झाली होती ती. स्वतःचेच केस उपटून घ्यायचे बाकी ठेवले होते.
तू माझ्या मागे का लागला आहेस. मला माहीत  आहे की तू काय ट्राय  करतो आहेस ते- माझ्यावर चालणार नाही.
ओह..खरंच?? इज दॅट सो?? यु आर सो अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी, दॅट यु आर ट्राइंग टु फिगर आउट माय माइंड.. ग्रेट!!
मला माहिती आहे, तुला मी आवडते, म्हणुन तू असे नेहेमीच मला छळत असतोस.
“कसला  गोड गैरसमज आहे तुझा!”
तिच्या मनात त्याच्या बद्दल इतका राग आला होता पण काहीच करता येत नव्हतं. कसा आहे हा ? इतका आढ्यताखोर माणुस पाहिला नाही कधी., इतके मित्र आहेत, पण असं बोलणारा एकही नाही. सगळे कसे गोंडा घोळत असतात समोर समोर. हाच एक वेगळा आहे जरा. लॉजिकली आवडायला नको हा आपल्याला, पण इतकी भांडणं, हॉट डिस्कशन्स होऊन पण याच्यासोबत का बरं वाटत असेल आपल्याला? ती विचार करत बसली.
तिच्या चेहेऱ्यावरचे रागीट भाव अचानक स्मित हास्यात बदलले, तो म्हणाला , तुझ्या बद्दल मला एक मस्त गोष्ट समजली आहे.
तिने ठरवले असते की ह्याच्या ट्रॅप मधे अडकायचे नाही. तरी पण तिला विचारल्या शिवाय रहावत नाही.. ती  म्हणाली काय?
तो म्हणाला- ही योग्य वेळ नाही, नंतर सांगीन कधीतरी ..
तेवढ्यात समोरून दोन मित्र येऊन टेबलवर जॉइन झाले, आणि अर्थातच ह्यांच्या गप्पा बंद पडल्या.
प्रसंग ४
ती तिच्या मैत्रिणी बरोबर बसलेली आहे. कॅन्टीन मधे समोर कोल्डड्रिंक ची बाटली आहे. दोघी अगदी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. मैत्रिणीला त्याच्या बद्दल सांगते ती. कसा सारखा त्रास देत असतो ते.
मग त्याच्याशी बोलणं का बंद करत नाहीस. अव्हॉइड कर ना त्याला.
अगं पण त्याची कंपनी बरी वाटते ग.. नाही कसं म्हणू त्याला?
ओह.. म्हणजे तू प्रेमात पडली आहेस तर..
मी?? छेः, अशक्य!! प्रेमात पडणं तर अशक्यच! अगदी जगातला शेवटला पुरुष जरी असला, तरी पण ह्याच्याशी लग्न? इम्पॉसिबल!!
मैत्रीण म्हणाली, अगं बहुतेक असंच असावं. विचार कर. पण मी त्याला कसं विचारू? प्रत्येकच गोष्ट अगदी कॅज्युअली घेतो तो.
साधी गोष्ट – जस्ट क्रिएट जेलसी.. ऍंड ही विल कम आउट ऑफ द क्लोझेट
***
प्रसंग – ५
कॅंटीन , सगळे मित्र मैत्रिणी बसलेले आहेत. समोर एक पेढ्यांचा डबा उघडा ठेवलाय. तेवढ्यात तो येतो, आणि समोर पेढे बघून एक पेढा उचलतो. कोणाचे पेढे रे?
लग्न ठरलंय.. एक मित्र म्हणाला.
कोणाचं?
’ति’चं..
काय?? कोण आहे तो तिच्याशी लग्न करतोय? पण चेहेरा पडला होता खर्रकन.
तिच्याकडे पाहिले. चेहेऱ्यावरचा खट्याळपणा लक्षात आला. त्याला काहीच कळले नाही. हातातला पेढा हाताच राहिला.
तेवढ्यात तिची मैत्रीण उठली, आणि म्हणाली, अरे ’ती’चे नाही, माझ्या ताईचे ठरले आहे लग्नं, खा पेढा.. आणि त्याचा जीव भांड्यात पडला एकदम.
त्याला आता मात्र रहावलं नाही. लक्षात आलं की आता वेळ केला तर वेळ निघून जाईल. सगळ्यांसमोर तिला विचारले, बघ, माझं पीजी पुर्ण झालंय. कॅंपस मधे सिलेक्शन पण झालंय एका कंपनीत. पॅकेज पण बरं आहे. तू माझ्याशी लग्न करशिल??
ती काहीच बोलली नाही, फक्त हसली, विथ द अशुरन्स टु सपोर्ट हिम  लाइफलॉंग.लग्नानंतर त्याने पुर्वी दिलेल्या त्रासाचा बदला तिने घेतला की —- हे त्या दोघांनाच  माहिती!

कपड्यात काय आहे??

पवाचीच गोष्ट आहे, सकाळी ऑफिसला निघायचं म्हणुन तयार होऊन बुट घालत होतो. तर तेवढ्यात आमचं धाकटं कन्यारत्नाने ( वय वर्ष १५) एकदम हसणं सुरु केलं..
म्हंटलं काय झालं?
तर म्हणे की तुम्ही अगदी वॉचमन सारखे दिसताय आज.. अगदी तस्साच ड्रेस घातलाय तुम्ही.

मी एकदा स्वतःकडे , अन स्वतःच्या कपड्यांकडे पाहिलं.काळा रंग माझा आवडता -स्पेशली ट्राउझर साठी म्हणुन काळी ऍरोची ट्राउझर, स्काय ब्लू लाइअनिंगचा ऍरोचाच शर्ट, नेव्ही ब्लु कंपनी लोगो असलेला  टाय (कस्टमर सेमिनार होतं म्हणुन, नाही तर मी टाय वगैरे वापरत नाही , नेहेमी सेमी फॉर्मल म्हणजे फुल स्लिव्ह शर्ट ट्राउझर्स मधे असतो.) लावलेला होता. आरशा समोर जाउन उभा राहिलो.. आणी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं.. तर समोर एक अर्धवट वयाचा पोट सुटलेला , ज्याने केवळ कंबरेला पट़्टा लावला आहे, म्हणुन पोट जागेवर आहे, नाहीतर कधीच खाली घरंगळलं असतं.. असा एक माणुस दिसला. पण  वॉचमन?? छे!!!
एकदम लक्षात आलं, की हल्ली वॉचमन लोकांचा पण असाच ड्रेस असतो. स्पेशिअली मल्टीप्लेक्स , मॉल्स मधे.. स्ट्राइप्स असलेला शर्ट, आणि काळी किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर… ते  लक्षात आलं आणि एकदम हसु आलं. टाय काढुन टाकला, अन कपाटाशी गेलो, तिथे जाउन दुसरा शर्ट घालायचा म्हणुन  प्लेन आकाशी रंगाचा शर्ट काढला.
तर मागुन कॉमेंट ऐकु आली.. ’बाबा, कोरियर बॉय चा ड्रेस होतोय ’ हा शर्ट नका घालू..
तिच्याकडे जरा चिडुनच पाहिलं.. तुला काय करायचय? मी काही पण घालीन..
असं म्हंटलं खरं, पण एकदा तिने कॉमेंट टाकल्यावर मात्र तो शर्ट घालायची इच्छा झाली नाही. कपाटाशी उभा राहुन  बरेच कपडे उलथा पालथ करुन शेवटी एक पांढरा शर्ट, नविनच घेतलेला (सेल मधे .. लुई फिलीप वर सध्या ५० टक्के डिस्काउंट आहे ) तो घालायला म्हणुन बाहेर काढला, आणि कन्यारत्नाकडे ’आता काय म्हणशील?? ” अशा नजरेने पाहिलं.
ती काहीच बोलली नाही, फक्त थोडं हसली… मला बरं वाटलं… चला बरं झालं!
पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं,   मला वाटतं की  मी शर्ट घालायची वाट पहात ती उभी होती . जेंव्हा शर्ट घालुन झाला, आणि जोव्हान वगैरे अंगावर उडवुन झाल्यावर टाय लावायला घेतला, तरीही ती काहीच बोलली नाही. मला खुप बरं वाटलं.. चला म्हणजे हाअ ड्रेस तरी चांगला आहे.. ना कोरियर बॉय , ना वॉचमन..
स्वतःशिच हासलो, अन  पायात सॉक्स घालणे सुरु केले. ओठ शिळ घालत होते, सगळं काही व्यवस्थित झालं की कसं बरं वाटतं नां? आज सकाळीच मस्त ब्रेकफास्ट झाला होता. फोडणीची पोळी अन दही ( शिळी पोळी कुस्करुन फोडणीला घातलेली ( कांदे पोह्या सारखी) मला वाटतं त्याला मुंबईला पोळीचा चिवडा म्हणतात) माझं फेवरेट आहे ते.. बायकोने  तिन वेळ चहा  पण करुन दिला होता कुरकुर न करता..
तिने न बोलताच तिच्या मनातले विचार मला समजतात , ती नक्कीच   मनातलया मनात म्हणाली असेल.. अरे किती चहा पितोस.. एका कपाला दिड चमचा साखर, म्हणजे दिवस भरात, तुझे १५ कप चहा गुणीले दिड चमचा म्हणजे जवळपास २२ चमचे साखर= २०० ग्राम साखर? इतकी साखर तुला आवश्यक नाही रे.. जरा चहा कमी कर… वगैरे वगैरे न एकावं लागल्यामुळे मी अगदी खुष होतो आज!
हं , तर काय सांगत होतो, तयार झाल्यावर मग घराबाहेर निघणार, तेवढ्यात मागुन हळुच आवाज ऐकु आला..
…….’ आई ,आपले (?) बाबा अगदी वेटर सारखे दिसतात की नाही आज  ह्या  ( काळी पॅंट +व्हाईट शर्ट + टाय) ड्रेस मधे??”
आणि नेमकं ते मला ऐकु आलं.. !!एवढा चांगला तयार होऊन घरून निघालो आणि ही अशी कॉमेंट!! आता काय करणार! तिच्याकडे पाहिलं, एक  टप्पल  द्यायला  मागे वळलो, तर ती  धावतच तिच्या बेडरुममधे गेली अन  दार लाउन घेतलं.. !! मी पण हसतंच घराबाहेर पडलो.. :)
थोड्या वर्षापुर्वी एक फॅशन होती. काय व्हायचं की पुर्वी लोकं सफारी घालायचे. म्हणजे ज्या कपड्याची पॅंट त्याच कपड्याचा शर्ट. त्याच्या खांद्यावर दोन पट़्ट्या किंवा समोर पॅच खिसा , असा काहीतरी ड्रेस होता तो. बरं फॅशन इतकी होती, की एखाद्या लग्नात वगैरे तर बरेचसे लोक असे सफारी घातलेले दिसायचे.बॅंड वाजवणारे पण असाच काहीतरी ड्रेस वापरायचे.  कधी कधी  या सफारीचा रंग पण अगदी बॅंडवाल्यासारखा   असायचा.   घालणाऱ्याची पर्सनॅलिटी अगदी छाडमाड असेल तर तर तो ड्रेस घालणारा आणि लग्नाच्या वरातीमधे बॅंड वाजवणारा, किंवा एखादा ऑफिस मधला चपराशी एकसारखेच दिसायचे.
या बाबतित स्त्रियांचं एकदम पक्कं असतं, की ठराविक साडी, मग यावर मॅचिंग असलेले इतर कपडे, मॅचींग बांगड्या.. इत्यादी.. त्या बाबतित त्या कधिच कॉम्प्रोमाइझ करित नाहीत. पुरुषांचं आपलं मिक्स ऍंड मॅच सुरु असतं नेहेमी.. काळी, राखाडी, किंवा नेव्ही ब्लु ट्राउझर आणि कुठलाही पाइन स्ट्रिप शर्ट.. बस.. चलता है. एक पेअर ब्लॅक शु आणि एखादा स्निकर असला की झालं.. और क्या चा्हीये?
एक गोष्ट आहे..अगदी लहानशा गोष्टींचा किती परीणाम होतो नां आपल्यावर? प्रत्येक ड्रेस हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रोफेशनशी निगडीत केला जातो. मग तो ड्रेस इतरांनी वापरला तर लगेच त्या माणसाला त्या प्रोफेशनशी कोरिलेट केलं जातं.  सह्ज जाणवलं म्हणुन इथे पोस्ट करतोय.

मुली कशा पटवाव्या…

मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतीत. तशीही प्रत्येकाचीच इच्छा असते  एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं.
प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या   बाबतीत खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात.
प्रत्येकच मुलगा कॉलेज मधे गेला, की हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडणार असं त्याला वाटू लागतं. कधी बरोबर ट्रेक ला गेलो, किंवा कधी एकत्र सिनेमाला गेलो की स्वर्गाला हात पोहोचल्या सारखे वाटतात.
जाउ दे.. वर जे लिहिलंय ते माझे विचार आहेत.. पण …बाळ सामंतांची एक कथा वाचली होती.. की मुली कशा पटवाव्या म्हणून.  हा लेख म्हणजे प्रेम करणाऱ्यासाठी एक रेडी रेकनर होऊ शकतो , असं वाटलं म्हणून थोडक्यात इथे त्यातलेच मुद्दे घेउन लिहितोय.  आरडी मधे जशी कंडेन्स्ड कादंबरी असते तसं.
मागच्या वर्षी अवाज ने ५० वर्षं पुर्ण झाल्याबद्दल एक सिलेक्टिव्ह लेख असलेला अंक काढला होता . त्या मधे दरवर्षीचा उत्कृष्ट लेख  त्यात इन्क्लुड केला होता. त्या अंकामध्ये हा लेख वाचण्यात आला.१९६५ सालच्या आवाज मधे आली होतं हे छापून.मुळ लेख आहे १९६५ चा तेंव्हा कालानुरूप थोडे बदल केले आहेत लिहितांना.
आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मराठी कथा कादंबऱ्यांमध्ये वापरलेल्या आहेत, त्या मुळे कदाचित तुम्हाला असंही वाटेल की हे काय… हे तर सगळं माहितीये आम्हाला….
१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं, आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.
२)ट्रेनमधे भरपूर मराठी वाचनीय साहित्य घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली, तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल, आणि मग ओळख  …. वगैरे….
३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडे बघत रहा. हाउस फुल्ल चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी , ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा.. आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण आला नाही म्हणून….
आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे  मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड तरी असतो,  किंवा एखादी मैत्रीण तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.
४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट ऑफर करा..
५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत असतांना एकदम जोरात पाउस येतो, आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच आडोसा नाही, तेंव्हा प्रवास करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला  काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..
६) एखादी आपल्या घराच्या आसपास रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा. तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्या वेळाचे पण पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.
७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक, साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात जाणं सुरु करा. चेहेऱ्यावर शक्य तेवढे बावळट भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास बसला की तुम्ही इतरांसारखे नाही, तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….
८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप आवडतं.
९) टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते.
१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी. हल्ली चेहेरा ओढणीने  झाकून प्रवास करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते.
मुलींचे प्रकार  किती तरी   असतात . प्रत्येक प्रकारच्या मुलींशी मैत्री करण्याचे हातखंडे पण वेगवेगळे असतात.
१)स्कॉलर मुली, ज्या केवळ वाचन, अभ्यास यामधेच इंटरेस्ट घेतात त्या.तुम्ही पण शुन्य नंबराचा चष्मा लावून अभ्यासु आहात असा आव आणला, आणि तिला मला ते मेकॅनिक्स फारच जड जातंय हो, किंवा मला सी प्लस जरा समजत नाही, कारण माझं १२वीला व्होकेशनल नव्हतं म्हणून.. वगैरे म्हणावं आणि मदत मागावी.
२)वांड्गमय प्रेमी , अशा मुलींना पुलं , वपु, अशा लेखकांच्या फॅन असतात.यांना गटवायच असेल, तर तुमचं पण त्या विषयातलं ज्ञान भरपूर असायला हवं, जर तुम्हाला पण अशा लेखकांच्या किमान काही पुस्तकांची नावं माहिती असतील तर या प्रकारातल्या मुलींशी गप्पा मारता येतात, आणि तद्नंतर प्रेम पण करता येउ शकतं.
तुम्हाला त्या लेखकांची काही पुस्तकं तरी वाचावीच लागतील, म्हणजे कधीही डिस्कशनचा मुद्दा निघाला की तुम्हाला पण थोडं बोलता येईल त्या विषयावर. आता या मुलींना कसं ….?? तर अगदी सोप्पं आहे,तुम्ही उपरोक्त लेखकाचं एखादं पुस्तक स्वखर्चाने विकत घ्या, आणि नंतर त्याच्या पहिल्या पानावर.. स्नेही.. श्री.. तुमचं नांव.. यांना सप्रेम भेट असं लिहुन खाली त्या लेखकाची सही करा.. ते पुस्तक तिला भेट द्या.. आणि सांगा की हे लेखक माझे चांगले परिचित आहेत.त्यांनी स्वतः भेट दिलेलं हे पुस्तक तिला भेट द्याल, तर तिचा तुमच्यावरचा विश्वास, अन प्रेम नक्कीच सुयोग्य दिशेने वाढू लागेल… . आणि नंतर…….नंतर काय ते सगळं कांही तुमच्याच हातात आहे.
३) कलावंत:- या प्रकारातली जर तुम्हाला आवडणारी मुलगी असेल तर तुम्हाला, कलाकार, नेपथ्यकार, वगैरे प्रकारात प्राविण्य मिळवावे लागेल.एखादा लहानसा रोल पण त्या नाटकातला पदरी पाडुन घेता आला तर ते पण करावं , म्हणजे तालमीच्या वेळेस ऑफिशिअली तिथे जाता येईल.
जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला एखाद्या नाट्य मंडळाचा सभासद होऊन तिथे तालीमीच्या वेळेस जाणं येणं सुरु ठेवावं लागेल. रात्री उशीर झाला ( तालिमीला) की मी सोडतो ना घरी.. माझ्या बाईक वर … असं म्हणून लिफ्ट देणं.. वगैरे वगैरे.. बरेच प्रकार आहेत. सुज्ञास जास्त सांगणे न लगे..
४)खेळाडु:- तुम्ही शंभर पाऊंड वजनाचे किंवा लेंग्याची नाडी न सांभाळता येणारे असाल तर कठिण आहे. ट्रेकिंग , वगैरे प्रकारात इंटरेस्ट असणं आवश्यक आहे . ट्रेक ला गेल्यावर आपण कचरा वगैरे कसा आपल्या बॅगेत भरुन खाली आणतो, आणि मग ड्स्ट बिन मधे फेकतो आणी निसर्ग वाचवण्यास हात भार लावतो हे रंगवून सांगा. आणि लिंगाणा सर केला होता ना…. तेंव्हा अशी सुरुवात करा…. म्हणजे ह्या प्रकारच्या मुली लवकर मैत्री करतील.
५)चित्रपट प्रेमी:- अशा प्रकारच्या मुलींची अजिबात कमतरता नसते. विद्वान ब्राह्मणा प्रमाणे, कुठल्या चित्रपटात कोणी काम केलं कोणाचं संगीत आहे, हिरोच्या लहान भावाचं नाव, किंवा होरोइनच्या बहिणीचा वाढदिवस वगैरे माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रपटातल्या हिरो , हिरोइन्स ची नावं अगदी संध्येतल्या चोविस नावाप्रमाणे पाठ असायला हवित.
केंव्हाही कधीही सिनेमा पहाण्याची तयारी आणि एक्स्ट्रा तिकिट यांचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. एखादा खूप गाजलेला सिनेमा जेंव्हा रिलिझ होतो तेंव्हा दोन तिकिटं रांगेत उभं राहुन ऍडव्हान्स बुक करुन ठेवावी.. आणि तिला पण चलतेस का म्हणून विचारलं, तर ती १०१ टक्के हो म्हणणार याची खात्री देतो मी. अशा तर्हेने ओळख वाढवा…!
६)वर्गभगिनी:- हिच्या कडे वर्गातल्या बऱ्याच बांधवांचं लक्षं असतं. तेंव्हा तुमचा नंबर इथे लागण जरा कठिणच , पण काही झालं तरीही प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. असंही  होऊ शकतं म्हणून प्रयत्न सोडु नये.
७)शेजारीण: – शेजाऱ्यावर प्रम करा हा येशु चा संदेश आहे हे खरं, पण शेजारच्य सुमीची आई पण डोळ्यात तेल घालुन तिच्यावर नजर ठेऊन आहे हे विसरू नका.तसेच इतर शेजारी पण तुमच्यावर नव्हे तर तिच्यावर कायम नजर ठेउन असतात, तेंव्हा तुमची प्रत्येक स्टेप ही कमित कमी दहा लोकं पहाणार आहेत हे लक्षात घेउनच स्टेप्स घ्या.तुम्ही काळजी पूर्वक पणे या प्रश्नाचा ध्यास घेतलात तर हा प्रश्न सुटू शकतो अगदी चुटकी सरशी…
८)कचेरीतली सहकारी:-यावर काही लिहायची गरज आहे असं वाटत नाही.आपण सगळे जाणकार आहातच ,काय?? बरोबर नां?
९) मित्र भगिनी:- हे फारच अवघड  नातं असतं.जर तुम्हाला सुंदर बहीण असेल , तर इतर मुलं तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला सिनेमाचे पास, नाटकाचे पास, वगैरे देतील, तुमच्या घरी येण्यासाठी काहीही करायला तयार असतील. हा प्रकार जरा डेंजरसच असतो. तेंव्हा सांभाळुन..
ओळख कशी वाढवावी??   आजकालच्या तरुणांना याची काहीच गरज नसावी.तरी पण, एकदा ओळख झाली की मग.. थापा मारणे सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्राणा पलिकडे प्रेम आहे, लाडके, तु माझी झाली नाहिस तर जीव देईन, चल आपण पळून जाउन लग्न करु, इत्यादी प्रकारचे डायलॉग्ज वेळोवेळी ्बोलत रहाणं प्रेम बहरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे
भेटण्याच्या जागा? चला प्रेम तर जमलं.. आता भेटायला जागा कुठल्या? या मधे ्खूप जागा असु शकतात. पण ज्या सर्व मान्य जागा आहेत, त्या म्हणजे बागा, आर्ट गॅलरीज, चाळीतली गॅलरी, बस स्टॉप , र्लोकलचा प्लॅटफॉर्म, चाळीचा जीना, बॉक्स.. ( हल्ली हा नसतो, पण पुर्वी बॉक्स हा पण एक क्लास होता सिनेमा चा जिथे केवळ दोघांची बसण्याची सोय असायची) समुद्राचा किनारा, आरे कॉलनी चा छोटा काश्मिर अशा अनेक जागा जाणकार लोकं सांगु शकतील.
मी स्वतःचा अनुभव सांगतो, नागपुरमधला असा एकही बगिचा नाही की जिथुन आम्हाला हाकललेलं नाही.. !!! असो!!! वरचा लेख  तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे.
तर मंडळी आता कामाला लागा लवकर.. !!!

मैत्रिण..

परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला पाहिलं आणि , खरंच हीच का ती ? ही शंका आली. वया बरोबरच  झालेले बदल सगळ्या शरीरावरच दिसत होते.असो… आणि तिला पाहिल्यावर सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या.  तिने मला पाहिले आणि  हसून  इकडे ये म्हणून इशारा केला.  हा नातू बरं का.. माझ्या मोठ्या मुलीचा  मुलगा. घरी नक्की ये रे.. नवऱ्याशी ओळख करून देते बघ तुझी.. पण मी मात्र कामाच्या घाईत असल्याने दोन मिनिट बोलून आणि नंतर  पुन्हा सावकाश भेटायचं प्रॉमिस  करून निरोप घेतला. एक जूनी मैत्रीण..  पण खरंच ती मैत्रिण होती का? हा  प्रशन मनात घोळवत कामाला लागलो.
मैत्रिण हे  हेडींग  वाचल्यावर तुमच्यातले अर्धे लोकं तरी या पोस्ट मधे काहीतरी मसालेदार वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने वाचणे सुरु करतील- पण तसे यात काही सापडणार नाही. माझ्या वयाच्या पुरुषाने मैत्रिणी बद्दल लिहावं म्हणजे खरं तर थोडं विचित्र वाटतं नाही का? मैत्रिण हा प्रत्येकाच्याच जीवनाचा एक हवा हवासा वाटणारा अविभाज्य अंग असतो.  खरं तर मैत्रिण या शब्दा मधेच एक मोठं काव्य दडलेलं आहे- यावर खंडकाव्य नक्कीच होऊ शकतं पण आज पर्यंत तरी कॊणी मैत्रिणीवर  कविता ( मला अभिप्रेत असलेल्या)लिहिलेल्या नाहीत. नुसतं मैत्रिण हा शब्द जरी उच्चारला तरीही आवाज हळूवार होतो- कापरं भरतं.. कसं मस्त पैकी पिसा सारखं हलकं हलकं वाटतं…. खरं की नाही??
मैत्रिण या शब्दाचा आशय वयानुरुप बदलत असतो. खरं तर स्त्री कडे पहाण्याची नजर वयानुसार बदलत असते. लहान असतांना केवळ तीन रुपात मुलींकडे पाहिले जाते. पहिला आई, दुसरा बहीण, तिसरा म्हणजे बायको. पण जेंव्हा ९वीत वगैरे असतो, तेंव्हा तर बायको हा प्रकार अशक्य आणि कल्पनेच्या पलिकडचा असतो -  पौगंडावस्थेतील वय – म्हणून मग फक्त एकाच रुपात मुलींकडे पहिले जाते . मी पण याला अपवाद नव्हतो.
शाळेत तर अजिबात मुली नव्हत्या.  को एड शाळा नव्हती, पण आमचं घर कन्या शाळेजवळ असल्यामुळे दररोज आमच्या घरा समोरून सगळ्या “शिरोडकरांचा”  राबता असायचा. माझी जी “शिरोडकर” होती, ती मात्र समोरून गेली की खाली मान घालायची आणि लाजून निघून जायची. कधी तरी पुढे गेल्यावर तिने मागे वळून पाहिले की मी अगदी कृतकृत्य होत असे. त्या दिवसात   बोलणं तर दूरच पण नुसतं पाहून हसणं पण शक्य व्हायचं नाही. मुलीशी बोलतांना कोणी पाहिलं तर ?? हा प्रश्न पण असायचा.
बरं, शेजारी रहाणाऱ्या सगळ्या मुली सुंदर जरी असल्या तरी   त्या मुलींना अगदी लहानपणापासून फ्रॉकला पिनने रुमाल अडकवलेले, भरलेल्या नाकाने  पाहिलेले   असल्याने , त्यांच्या बद्दल तशी भावना कधीच निर्माण झाली नाही- त्यांच्याशी बोलणं व्हायचं, पण त्या मैत्रिणी मात्र कधीच झाल्या नाहीत.  दुसरी गोष्ट म्हणजे मुलीशी बोलणं हा कमीपणा समजला जायचा. पौगंडावस्थेतील वय, हवी हवीशी वाटणारी मैत्रिण, पण प्रत्यक्षात मात्र कधी कोणी मिळालीच नाही.. कधी खरं  बोलण्याची हिंम्मत झालीच नाही. खऱ्या मैत्रिणी मिळाल्या त्या नोकरी लागल्यावरच!
माझा एक खास मित्र होता , त्याचं नांव लिहत नाही, कारण कदाचित त्याची मुलगी पण हा ब्लॉग वाचत असेल . तर त्याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. ती तशी , त्याच्या घराजवळच रहायची, एकदा त्याने ’ ती’ ला दाखवले, आणि म्हणाला कशी दिसते? आता १५-१६ वर्ष वय असतांना कुठलीही मुलगी सुंदरच दिसणार.. पण नंतर मात्र तो जाम पिडायला लागला. ती असं म्हणते, मी तसं म्हणतो वगैरे वगैरे. तिच्या प्रेमात अक्षरशः पागल झाला होता तो! तिचं एक कोड नेम ठेवलं होतं आम्ही, की ज्या मुळे कोणाही समोर तिच्याबद्दल बोललं तरी चालायचं. असो विषयांतर होतंय, पण आमच्या वेळचे दिवस थोडक्यात लक्षात यायला हवे, म्हणून ही आठवण लिहिली आहे.
कट्ट्यावर जाऊन बसणे आणि फुल टू टीपी करणे हा एक नेहेमीचा उद्योग ! संध्याकाळचे सहा वाजले की कट्ट्यावर जाऊन बसायचे आणि गप्पा मारत उभे रहायचे. मस्ती करण्यावर पण मर्यादा होत्याच- कारण थोडाही  टारगट पणा केला, तर घरी बातमी पोहोचेल ही खात्री -आणि मग मार बसणार हे पण नक्की! कट्टा नसेल तर. किंवा समोरच्या मैदानात क्रिकेट खेळणे आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर , ” ही तुझी, ती लाल वाली माझी, ती हिरवी शाम्याची ” वगैरे कॉमेंट्स तर ठरलेल्या. मला वाटतं की त्या मुलींना पण ते आवडत असायचं. कधी अरे काल तू हिरवी घेतली होतीस, आज हिरवी माझी.. वगैरे.. … पण कॉमेंट्स व्हायच्या.
त्यातलीच  एक सुबक ठेंगणी    समोरून गेली की मित्र ’अरे वहिनी  चालली बघ’ म्हणून आवर्जून  तिच्याकडे लक्ष वेधून द्यायचे- आणि ते पण तिला ऐकू जाइल इतक्या मोठ्या आवाजात. :) ती लाजायची, आणि मला पण उगाच लाजल्या सारखं व्हायचं. अजून एक मुलगी होती तिच्यावरून मला मित्र चिडवायचे- एखाद्या मुलीच्या नावाने चिडवलं  जाण्यातलं सुख  समजेल आजच्या पिढीला?
माझा एक मित्र होता, नितीन ( आडनांव मुद्दाम लिहत नाही) तो तर तुझी ती मैत्रीण कोण आहे हे सांग म्हणून खूप मागे लागायचा. पुढे काही वर्षानंतर नोकरी लागली आणि मग केवळ  सुटी मधे घरी जाणं व्हायचं. मग तेंव्हा एक दिवस ती कडेवर बाळ घेऊन किंवा नवऱ्याच्या सोबत स्कुटर वर फिरतांना दिसली की -धत तेरी की.. झालं वाटतं लग्न हिचं…. छाती मधे कसंसंच   व्हायचं. ती पण पहायची , आणि हलकेच स्मित देऊन पुढे जायची. एकही शब्द न बोलता सुरु झालेली मैत्री ही अशी केवळ स्मित हास्यावर  संपायची .
मुलींशी नुसतं बोलणं पण शक्य नसायचं. एखादी सखी शेजारीण  उगाच आवडायची. सुटी मधे वगैरे सगळ्यांकडेच पाहुणे यायचे. तो म्हणजे आमचा प्रेमात पडण्याचा काळ. शक्य तितक्या प्रकारे प्रयत्न करून एका तरी मुलीशी मैत्री करायचीच हे ठरवले जायचे. सुटी लागली, की मित्रं पण ” सुटी मधे काय काय केलं ते सांग बरं का – आणि मी पण तुला सांगीन ” म्हणून आणा शपथा घालायचे.  पण त्या ही वयात काय बोलावं आणि काय बोलू नये ते आपसूकच समजत होते. :) आणि कोणीच एकमेकांना काही  सांगत नसे.
नंतर नोकरी सुरु झाल्यावर खऱ्या मैत्रिणी मिळाल्या. ट्रेकिंग , हे मुख्य कारण! आमचं ट्रेकिंग गृप दर गुरुवारी ट्रेकला जायचा. नेहेमीचे ठरलेले लोकं असायचे. मुली – तसेच मुलं पण. एकाच आवडीने भारलेले आम्ही मित्र मैत्रिणी दर गुरुवारी  भेटायचो. जर ट्रेक नसेल तर कुठे तरी एकत्र जाऊन सिनेमा पहाणे वगैरे प्रोग्राम असायचा..  एक लायब्ररी होती, त्या लायब्ररी मधे पण  शेजारी रहाणारी एक मुलगी नेहेमी भेटायची,  तसं कधी बोलणं झालं नव्हतं, पण  मग समान वाचनाची आवड म्हणून तिच्याशी मैत्री झाली होती. वपुंचं पार्टनर मी हजारेक वेळा तरी वाचले असेल. तिलाही ते पुस्तक खूप आवडायचं- अगदी भर भरून बोलायची.  वपूंचं नाव  निघालं की. एक निखळ मै्त्री असलेली मैत्रिण म्हणजे काय ह्याचा अनुभव मला तिने दिला. दुनियादारी मधल्या कुठल्या पात्राशी स्वतःला कोरीलेट करतोस म्हणून तिने एकदा विचारले होते.. आणि माझे उत्तर होते श्रेयस.. :)
मैत्रिण म्हंटलं हल्ली लोकांच्या मनात  फक्त एकच भावना निर्माण होते. आपल्याकडे मैत्रिणी फार कमी असतात, पण मानलेले भाऊ , बहीण खूप असतात. माझं स्पष्ट मत आहे, की सख्ख्या भाऊ बहीण या  नात्यांशिवाय सगळी नाती एकदम खोटी- बेगडी असतात.कुठल्याही नात्याचे नांव न देता मैत्री होऊ शकत नाही का? सहज शक्य आहे ते- अगदी कुठलाही नात्याचा मुलामा न चढवता केवळ मैत्री नक्कीच होऊ शकते.  मग हा उगीच मनाचा खोटे पणा कशाला?? उगीच मानलेला भाऊ, मानलेली बहीण अशा नात्यांमध्ये मैत्रिणी चे नितांत सुंदर नाते लपेटून त्या मधल्या सुंदर नात्याची आहुती का म्हणून दिली जाते?  मला वाटतं की याचं कारण म्हणजे  आपण ज्या मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढलो  – ते आहे.  एक मुलींशी बोलणे, मैत्री करण्यासाठी वापरला जाणारा सेफ मार्ग म्हणजे मानलेले नाते . बरेचसे लोकं हा मैत्रिण हा शब्द अगदी अस्पृष्य  असल्या प्रमाणे समजून केवळ मैत्रिण या नात्याचा – रस्ता बंद करून टाकतात आणि एका निर्भेळ आनंदाला  आपल्या आयुष्यात मुकतात.
मैत्रिण म्हंटल्यावर तिला तू आज सुंदर दिसतेस बरं कां.असं तुम्ही म्हणू शकता का?  जर उत्तर होय  असेल, तर तुमची मैत्री निकोप आहे असे मी म्हणेन. मैत्रिण म्हणजे गर्ल फ्रेंड, बाईक वर मागे बसून फिरणारी, मे बी फ्युचर लाइफ पार्टनर -असा अर्थ मनात धरणाऱ्या लोकांना मैत्रिण या शब्दाचा खरा अर्थ समजलाच नाही  . अशी मानसिकता असणारी  मुलं एका सर्वांग सुंदर वेगळ्याच नात्याला मुकतात. ज्यांच्या खऱ्या मैत्रिणी /मित्र आहेत त्यांच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते.
स्वतःला पण जेंव्हा खरंच  चांगल्या मैत्रिणी मिळाल्या तेंव्हा मात्र , – आणि निरपेक्ष मैत्री  मधला आनंद समजला. आता या वयातही मैत्रिणी मित्र असणे काही वावगे आहे असे मला वाटत नाही. स्त्री आणि पुरुष या नात्यांमधला एक वेगळा ’अनडिफाइन्ड टोन” ज्याला समजला त्याला मैत्रिणीचे हे  नाते म्हणजे काय ते समजू शकेल. सेक्स्युअ‍ॅलिटी ही फक्त सेक्स पुरतीच मर्यादित असते असे नाही.  अर्थात हे समजणे किंवा लक्षात येणे फार कठीण आहे, पण अशक्य मात्र निश्चितच नाही..
मैत्रिणीच्या नातं हे एकच नातं आहे की  ज्या नात्यातून आपली नैतिक उन्नती होऊ  शकते. नैतिकतेची खरी शिकवण ह्या नात्यातून मिळू शकते . स्त्री कडे पहातांना केवळ एकाच नजरेने न पहाता एक व्यक्ती म्हणून पहाण्याची सवय या नात्यातून कल्टीव्हेट होऊ शकते.  नैतिक उन्नती साठी का होईना, पण जसे आपल्या कडे स्त्रियांसाठी ३३ टक्के रिझर्वेशन नोकरी, शाळा, कॉलेज अ‍ॅडमिशन्स मधे ठेवलेले आहे, त्याच प्रमाणे आपल्या  जीवनात पण ३३ टक्के मैत्रिणीं साठी ठेवणे  आवश्यक आहे )
म्हणून म्हणतो,  हे नातं कसं श्री्कृष्णाच्या सखी सारखे असावे, द्रौपदीचा सखा असल्याप्रमाणे  असावे.. :)

ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात?

आपण ब्लॉग वर काही तरी लिहितो, आणि लोकं ते वाचतात आणि कॉमेंट्स पण देतात.    बरेचदा तुम्ही   एखाद्या वर्षा पुर्वी लिहिलेल्या पोस्ट वर   अचानक पणे   पण  कॉमेंट येते, आणि तुम्हाला एकदम ’ ही इतक्या जुन्या लेखावर कॉमेंट कशी काय आली ?’ याचे आश्चर्य वाटते .  लोकं या इतक्या जुन्या लेखापर्यंत कसे पोहोचतात?  हा प्रश्न तर मला कित्तेक दिवस छळत होता.
ब्लॉगची माहिती लोकांच्या पर्यंत कशी काय पोहोचते?   मराठी ब्लॉग  विश्व वरून हे उत्तर बहुतेकांच्या मनात येईल .  ब्लॉग वर लिखाण नविन सुरु केल्यावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे मराठी ब्लॉग विश्व करते.  तुमच्या नविन पोस्ट्सना  या साईटवरून भेट देणारे लोकं याच साईट वरून येतात! बरेचसे लोकं तुमच्या ब्लॉग ला इमेल मधे सब्स्क्राइब करतात, तुम्ही नविन पोस्ट लिहिली की ते त्यांना मेल मधे समजते .
सर्च इंजीन्स वरून येणारे लोकं पण बरेच असतात. सर्च इंजिन्स   मध्ये एखादा कळीचा शब्द लिहून शोध घेतला जातो, आणि जर तुमच्या ब्लॉग वर पण तो शब्द वापरला गेला असेल तर तुमचा ब्लॉग  सर्च इंजिन शोधते आणि शोधकर्त्याला  तुमच्या ब्लॉग   ची यु आर एल दाखवते.
वर्डप्रेस वर जर तुमचा ब्लॉग असेल तर लोकं    सर्च इंजिन्स  मधे कोणता शब्द शोधून  लोकं तुमच्या ब्लॉग वर  आले आहेत  ते  पण समजू शकते.   माझ्या ब्लॉग वर आजपर्यंत लोकं कुठल्या टर्म्स वापरून सर्च इंजिन्स वरून आले हे  माझ्या ब्लॉग वर चेक  केले तर खूप वेग वेगळ्या टर्म्स वापरलेल्या आढळल्या.
सगळ्यात जास्त शोधला जाणारा शब्द म्हणजे स्त्री पुरुष! आणि त्याच्या खालोखाल येतो तो अश्लिल फोटो,    नंतर एड्स आणि एड्सचा हल्ला ही टर्म पण बरेचदा शोधलेली दिसून येते.ह्या  अशा सर्च सोबतच नेदा इराण, किंवा फारशी लोकांना माहिती नसलेली एक अंदमान निकोबार द्विपसमुहातील ’जुजुब’ नावाची आदिवासी जमात या बद्दल शोध घेतांना पण लोकांनी माझ्या साईटला भेट दिलेली आहे. जवळपास ७५० लोकं ’काय वाटेल ते ’ हे शोधून या ब्लॉग पर्यंत पो्होचले . उखाणे, घर वगैरे शोधून ब्लॉग वर भेट देणाऱ्यांची संख्या पण खूप आहे.
थोडक्यात जर तुम्हाला ब्लॉग वर जास्त लोकांनी भेट द्यावी असे वाटत असेल ,तर हे जास्तीतजास्त सर्च केले जाणारे शब्द    शब्द तुम्ही आपल्या ब्लॉग वर वापरा, म्हणजे  ब्लॉग ची व्हिजीब्लिटी वाढेल..
हे सगळं शोध म्हणून ठिक आहे. पण लोकं जेंव्हा अश्लिल फोटो असे मराठी मधे लिहून शोधतात तेंव्हा काय  उत्तर मिळेल अशी अपेक्षा असेल लोकांची?   अश्लिल  फोटोंना वाहिलेल्या साईट्स असतांना पण मराठी ब्लॉग बर लोकं का बरं असे शोध घेत असावेत?
एड्स बद्दल जेंव्हा मराठी मधे शोध घेतात  ते कां?   त्यांनी काही तरी केलेलं असावं कां की जे करायला नको ते?? आणि मग आपल्याला एड्स झाला तर नाही या शंकेने  नेट वर शोधाशोध..तुम्हाला- मला कधी हिजडा, किंवा एड्स वगैरे शोधावेसे वाटत नाही-  मग लोकांना का वाटावी? या वर जास्त काही लिहित नाही, फक्त लोकं काय शोधतात ते  खाली दिलंय !
बाय द वे, या पोस्टची कल्पना सुचली नॅकोबाच्या ह्या पोस्ट वरून

सार्वकालिक

शोधाViews
पुरुष स्त्री3,714
अश्लिल फोटो2,210
चावट1,661
स्त्री1,252
ऑर्कुट1,143
अश्लिल672
kayvatelte611
एड्स चा हल्ला568
बातम्या बातम्या497
कविता432
उखाणे421
घर418
अश्लिल कथा410
एड्स392
लोकमत284
मित्र281
स्त्री आणि पुरुष233
कथा224
हिजडा213
फोटो181
मुली168
मनसे167
क्रिष्ण159
साईबाबा153
काय वाट्टेल ते143
चावट वहिनी143
neda iran139
इंटरनेट इंटरनेट136
al jaffee136
इंटरनेट130
गाणी130
झी टीव्ही127
jujube125
arya ambekar121
इंटरकोर्स120
जॉब118
मराठी चित्रपट116
आर्मी110
प्रेमात110
पत्रकारिता108
वात्रट106
बॉडी101
होळी100
किरण बेदी97
नेव्ही93
दुनियादारी91
जनगणना89
साई बाबा82
फोटो काढले81
सारेगमप79