Sunday, 13 May 2012

गमतीशीर म्हणी..

परवा सुहासचा एक बझ पाहिला, त्यामधे त्याने काही चांगल्या म्हणी असतील तर सांगा म्हंटलं होतं.तो बझ पाहिला आणि काही जुन्या म्हणी आठवल्या.त्यातलीच एक म्हण तिथे लिहिली. ती म्हण आमच्या लहानपणी एक बाई भांडी घासायला यायची  तिच्या वापरा मधे होती. ही म्हण आणि अनेक  अशा अनेक म्हणींचा खजिना असायचा तिच्या पोतडीत.
माझी आज्जी माझे खूप लाड आणि कौतूक करायची. मी काहीही केले तरी आईच्या मारा पासून वाचवायची. तेंव्हा ती भांडेवाली बाई ” लाडका लेक मंदिरी हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे” अशी अस्सल इरसाल म्हण वापरायची. त्या तशा प्रसंगाला अगदी चपखल बसणारी. तेंव्हा मात्र त्या मावशीचा खूप राग यायचा- पण आज मात्र तिच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. श्लील- अश्लिलतेच्या मर्यादा ओळखून केलेल्या ह्या जुन्या म्हणी म्हणजे एक अमुल्य ठेवाच  आहे.
हा सगळा आपला पूर्वापार चालत आलेला भाषेचा ठेवा आता नामशेष होत चाललाय. बरेचदा तर शब्द चार चौघात बोलण्यासारखे नाहीत, म्हणून टाळल्या जातात. आपण साध्या साध्या वापरातल्या शब्दांकडे पण वाईट म्हणून बघतो.
बऱ्याचशा जुन्या गावाकडल्या  म्हणींच्या मधे काही म्हणी मधे तर बरेच श्लील -अश्लीलतेच्या मर्यादा रेषेवरचे  शब्द पण सर्रास वापरले गेलेले दिसतात. स्पष्टच बोलायचं तर  असभ्य समजले जाणारे, किंवा घाण समजले जाणारे शब्द विपुल प्रमाणात वापरले जातात . काही म्हणी तर पुर्ण म्हटल्या पण जात नाहीत, तर केवळ पहिला किंवा दुसरा अर्धा भागच वापरला जातो.अर्थात त्यात काही वावगं आहे असे नाही, पण पुर्ण म्हणी पण मजेशीर असतात. जसे नावडतीचे मीठ अळणी, हा अर्धा भाग नेहेमीच वापरला जातो, पण पुढचा अर्धा भाग आहे तो मात्र कधीच वापरला जात नाही. पुर्ण म्हण अशी आहे,  “नावडतीचे मीठ अळणी, आवडतीचा शेंबुड गोड”
तशीच ही पण एक म्हण बघा” नाचता ये‌इना अंगण वाकडं, स्वयंपाक येईना ओली लाकडं” या म्हणीतील पण फक्त पहिला अर्धा भाग वापरला जातो. तसेच ’येथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नव्हे” ही म्हण पण त्याच प्रकारातली. नेहेमी अर्धवटच वापरली जाते त्यामुळे दुसरा भाग माहितीच नसतो.
म्हणी आणि  हे बऱ्याच वर्षा पुर्वी पासून चालत आलेले आहेत. एक पान भर एक्स्प्लेनेशन देउन जे होत नाही ते एका म्हणी मुळे होते. एक लहानशी म्हण बरंच काही न बोलता पण बोलून जाते.  भाषेचे सौंदर्य आहे म्हणी, अलंकारामध्ये असते. माझ्यासारख्या लोकांना जरी ते लिहिता येत नसलं तरीही वाचायला मात्र नक्कीच आवडतं.  . बहुतेक म्हणी या बोली भाषेत वर्षानुवर्ष ( कदाचित शेकडॊ वर्षापासून)  चालत आल्या आहेत.त्यातल्याच काही इथे लिहितोय.
उगाच काहीतरी कारण सांगायचं, म्हणजे वड्याचं तेल वांग्याला लावायचं असं कोणी केलं की त्या साठी ’ “पादऱ्याला  पावट्याचा आधार ” अशी म्हण वापरली जायची.  ही एक जुनी म्हण आहे  किती अर्थ पुर्ण आहे बघा, अजिबात काही सांगायची गरज नाही- ” अवघड जागचं दुखणं, आणि जावई डॉक्टर “. एका वाक्यात कितीतरी सांगून टाकलं – इतकं की अजून एक्प्लेनेशन द्यायची गरजच नाही.
एक म्हण आहे, ” कौतुकाची वरात, अन हागायला परात” या अशा खास  म्हणी पूर्वीच्या काळी नेहमीच्याच वापरात होत्या. एखाद्याचं कौतूक करायचं तर किती कराव?  बरेचदा एखाद्या माणसाला दुसऱ्याचे इतकी जास्त वर वर करण्याची सवय असते की दुसऱ्या पाहणाऱ्याला ती ’चमचेगीरी’ करतोय अशी वाटते. लहानशा म्हणी नुसार सगळी परिस्थिती कशी स्पष्ट होते पहा.
तशीच ही एक म्हण पहा, ” कावळा गेला उडून, गू खा चाटून”. पुर्वी वाळण टाकलं की कावळे उडवायला तिथे कोणाला तरी बसावं लागायचं. समजा एखाद्या वेळेस काही कामा निमित्त त्या व्यक्तीला उठून जावं लागलं आणि तेवढ्यात जर कावळे सगळं वाळण घेउन उडून गेले तर काहीच शिल्लक रहात नाही. हा झाला शब्द्शः अर्थ, आता व्यावहारिक अर्थ काय आहे ते सांगायची गरज वाटत नाही. इंग्रजी मधे एक म्हण आहे बोन्स  फॉर लेट कमर्स !
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून परवाच्या भाषणात एक म्हण वापरली होती, “शेण आपण खायचं, आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायच” . अर्थात अशा म्हणी वापरल्या की सरळ टाळ्या पडणारच भाषणात! तसंही एक आहे दोन्ही ठाकरे बंधू अगदी खास शेलक्या म्हणी शोधून वापरतात त्यांच्या भाषणांमधून – हा वारसाहक्काने मिळालेला ठेवा आहे त्यांना बहूतेक!
बरं सगळ्याच म्हणी काही अशा वाईट शब्दांच्या ( त्यांना वाईट कशाला म्हणायचं? साधे सोपे सामान्य शब्द आहेत ते)  असतात असेही नाही तर कधी कधी अगदी साधे शब्द वापरले  तरीही  सामाजिक जिवनाचे वास्तव म्हणून ” काळी बेंद्री  एकाची, सुंदर बायको लोकांची” अशी म्हण पण वाचायला मिळते.
एक म्हण  एका मायबोलीकराने वापरली होती ती मायबोलीवर वाचली होती ” नको तिथे बोटं घालू नये, आणि घातली तर वास घेत बसू नये” हसून हसून पुरेवाट झाली होती वाचल्यावर. एका लहानशा म्हणीमधे किती मोठा आशय आहे नाही?
“घरची म्हणते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा” ही म्हण किंवा घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे ह्या दोन्ही म्हणी जवळपास एकाच अर्थाच्या पण एका म्हणीच्या ठिकाणी दुसरी वापरलेली चालत नाही. योग्य त्या वेळी योग्य ती म्हण वापरणे या मधेच खरी कला आहे.
बरेचदा अशक्य गोष्टींची अपेक्षा केली जाते. कितीही महत्वाचे काम असले म्हणून काय झाले?  नाही होणार सांगायची ही एक पद्धत पहा, तुम्ही कितीही सांगाल हो, काम झालंच पाहिजे म्हणून, पण “जावई पाहुणा म्हणून आला, तर रेडा दूध देईल काय?”
काही लोकं  जे अगदी ऑफिसमधे साहेब लोकांची चमचेगिरी करतात त्यांच्या साठी एक म्हण आहे, ’ साहेबाने रेड्याचे दुध काढ म्हंटले, तर तो चरवी ( भांडं) कुठे आहे म्हणून विचारतो’ . ही म्हण तर  मी पण बरेचदा वापरतो.
एखाद्या मोठ्या माणसाचा लहानसा सेवक पण खूप मान मरातब मिळवतो. उदाहरणार्थ, जसे आमिरखानचा ड्रायव्हर पण आमिरखानचा पर्सनल अ‍ॅडव्हायझर असल्यासारखा वागत असतो. अशाच प्रकारच्या प्रसंगांसाठी ” थोराघरचे श्वान,त्याला देती सर्व मान” ही म्हण अगदी पर्फेक्ट बसते.(आमिरखान नाव फक्त काहीतरी वापरायचं म्हणून वापरलंय.)
खूप खूप लक्ष द्यायचं, पण …. जाऊ द्या, एक म्हण , जी स्वतःच सगळं स्पष्ट करते – ” दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा, अन मोरीला बोळा घालायचा” मला ही म्हण पण खूप आवडते. ’ताका पुरते रामायण’ किंवा साधारण तशीच “नागोबा  म्हसोबा पैशाला दोन, पंचमी झाली की पुजतय कोण?” या एकाच अर्थाच्या म्हणी आहेत.एक नेहेमीच्या वापरातील, आणि एक विस्मृतीत गेलेली.
नवरा बायको, जावई सासरचे लोकं, सासू सून , या सगळ्या नात्यांचे वेगवेगळे पदर उघडले जातात या म्हणींच्या मधून.  अशा अनेक म्हणी आपल्या मराठी मधे आहेत.   ही एक गमतीशीर म्हण बघा ” भोळी ग बाई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला पुरणपोळी” किंवा ही “मी नाही त्यातली कडी लावा आतली”अशा द्वैअर्थी म्हणी पण आहेत बर्याच आहेत. या सारख्या अनेक म्हणी आहेत. पण  सगळ्यांच्या बद्दल लिहित बसलो तर एक ग्रंथच होईल, म्हणून थांबतो इथे.
थोडं शोधलं , तर नेट वर एक सुंदर साईट दिसली म्हणीं साठी खास वाहिलेली. त्या साईटवर अशा ९०० च्या वर म्हणी आहेत.अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment