Sunday, 5 August 2012

वाइफ बॅशिंग सर्व्हे

आपण नेहेमीच वापरतो. तो कसा  काय अस्तित्वात आला हे ठाऊक आहे ? पूर्वीच्या काळी इंग्लंड  मधे बायकोला मारण्यासाठी जास्तित जास्त  अंगठ्या एवढ्या जाड केन ने मारणे  कायद्याने मान्य होते,  म्हणून थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला.
राजा भाऊंचं लग्न झालं होतं, तीर्थरुपांच्या समोर पाया पडायला म्हणून जोड्याने वाकल्यावर , वडील हळूच फक्त राजाभाऊंना ऐकु येईल अशा आवाजात  म्हणाले, नमस्कार करायला आलात, एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही गृहस्थ झाला आहात- स्वतः बरोबर पत्नीचीही जबाबदारी आता तुमच्यावर आहे. प्रसंगी भांडणं होतील, खूप संताप येईल – पण तेंव्हा मी आज सांगतो ती गोष्ट लक्षात ठेवा ” पत्नी ही घरातली लक्ष्मी असते, तिच्यावर कधीच हात उचलायचा नसतो”. ही शिकवण राजा भाऊंच्या अगदी मनात पक्की बसल्याने,   आयुष्यभर प्रकर्षाने पाळली.असं नाही की  राजा भाउंचे कधी बायकोबरोबर भांडण होत नाही, किंवा त्यांना बायकोचा राग येत नाही, पण  वडिलांनी सांगितलेले वाक्य आठवतं आणि मग हात उचलला जात नाही- राग शांत होतो.
लग्न झाल्यावर भांडणं होणारच-  आयुष्यभर  “न भांडता ” सोबत रहाणारे नवरा – बायको मला अजून तरी भेटायचे आहेत.  लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड, भांडणं ही ठरलेली आहेतच- फक्त त्याची तीव्रता कमी जास्त होऊ शकते. वाद विवादाची तीव्रता वाढल्यावर  बायकोवर हात उचलणे हे पण तसं जगभर कॉमन   आहे.  बाहेरच्या देशात अशा केसेस तर नेहेमीच रजिस्टर होत असतात.
जगभरात नवऱ्याने बायकोला  मारहाण  करण्याची जी चार मख्य कारणं आहेत ती अशी आहेत. १) सेक्स ला नकार देणे २) वाद विवाद करणे ३) न सांगता घराबाहेर जाणे ४)मुलांकडे दुर्लक्ष करणे ही आहेत.
या घटना फक्त  समाजाच्या खालच्या आर्थिक  स्तरांमधेच  ( कामगार वर्ग, ब्लु कॉलर्ड )  घडतात असे नाही , तर ’उच्च शिक्षित , कारखानदार, सिनेमा नट – नट्या’  सगळ्यांच्याच बाबतीत  या  प्रकारच्या घटना  घडत असतात. अ्धुन मधून एखाद्या अशा घटनेच्या  शिकार शिकार झालेल्या  एखाद्या अभिनेत्रीचे फोटो  पेज थ्री वर पण  दिसतो.  अशा घटना जरी घडत असल्या तरीही ,फक्त  बहुतेक वेळा अशा घटनांना प्रसिद्धी  न देता, पातेल्यातलं वादळं पेल्यातच शमवले जाते.  पोलीसांपर्यंत जाणाऱ्या तक्रारींचे प्रमाण नगण्य आहे.
“   बायकोला पुरुषाने मारणे  हे तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य?” ह्या प्रश्नावर  टाइम्स ऑफ इंडीयाने एक प्रातिनिधिक स्वरुपाचा सर्व्हे केला होता. सर्व्हे फक्त टीनएजर्स साठी – वय वर्ष १५ ते १९ पर्यंतच्या तरूण तरूणींच्या साठी होता.    यावर   तरुण , तरुणींनी दिलेली  उत्तरं आणि सर्व्हेचे रिझल्ट वाचल्यावर मला तर धक्काच बसला आणि  वाईटही वाटलं. कारण परिस्थितीच  तशी काळजी करण्यासाखी  आहे.
५७ टक्के मुलांनी आणि ५४ टक्के मुलींचे पण  बायकोला मारणे योग्य असेच मत दिले. एक वेळ मुलांनी बायकोला मारहाण करणे योग्य  हे मत दिले तर एक वेळ समजू शकतो,  पण ५४ टक्के  मुली पण जेंव्हा स्त्रियांना नवऱ्याने मारल्यास हरकत नाही असे मत देतात, तेंव्हा त्यांच्या मानसिक जडणघडणीची कीव येते – त्यांची  लग्नानंतरच्या  सह जीवनाविषयीची ही अशी मतं पाहिल्यावर ह्या मागचे कारण काय असेल याचा विचार केल्यावर जे काही माझ्या मनात  आलं   ते खाली लिहितोय.
मुला-मुलींनी जे आपले स्वतःचे  मत  तयार करून घेतले आहे,   त्या साठी, त्यांना  मी या अशा विचारांसाठी दोष देणार नाही. मुलांची कुठल्याही गोष्टीवरची मतं ही एकदम तयार हो नसतात. लहानपणापासून  आसपासच्या घटनांचा त्यावर परिणाम होत असतो. एखाद्या  अगदी लहानपणापासून पट्टीच्या नॉन व्हेज खाल्लं जाणाऱ्या  घरातल्या मुलाला, कदाचित चिकन च्या दुकानात ते कापताना आणि स्वच्छ करतांना पाहून काही वावगं वाटणार नाही, कारण ते त्याकडे पहाण्याची त्याची दॄष्टी ही एक अन्न म्हणून असते. पण व्हेज खाणारा मुलगा, चिकन कापतांना पाहू शकणार नाही- कारण त्याच्या दृष्टीने चिकन ही एक कोंबडी म्हणजे जीव आहे.  दृष्टीकोन बदलला की विचार कसे बदलतात याचे हे एक उदाहरण.
मुलांवर लहानपणापासून कळत नकळत  संस्कार होत असतात. दुसऱ्याचे अनुकरण करणे हे लहानपणचे लक्षण आहे. बालवाडीत गेल्यावर पहिल्या दिवशी जेंव्हा एक मूल रडू लागते, तेंव्हा त्याला पाहून सगळा वर्ग गळा काढणे सुरु करतो. हे मुलं खेळायला शेजारी पाजारी गेली, की त्यांचा इतरांशी संबंध आला , की मित्र मंडळीचे पण मनावर नकळत संस्कार होत असतात. एखाद्या सिगरेट ओढणाऱ्या मित्रांमुळेच सिगरेटची सवय लागू शकते- (मला लागली होती). संगती संग   दोष अशी काहीशी एक म्हण आहे.
संस्कारक्षम वयामधे   टीव्ही वरच्या सिरिज, किंवा सिनेमा यांचाही खूप परिणाम होतं.  येता जाता उच्चभ्रू (!) घरातल्या पुरुषांनी स्त्रियांच्या खाडकन थोबाडीत मारणे वगैरे  तर नेहेमीच दाखवले जाते.  नेहेमी  तेच ते पाहून तेच योग्य आहे असे कशा वरून वाटत नसेल? स्वप्नरंजन आणि वास्तव यांची सरमिसळ होऊन मनात  द्वंद्व निर्माण होते. एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हा निर्णय मनाला घेता येत नाही.
मुलांवर आई-वडिलांकडून केले गेलेले संस्कार सगळ्यात महत्त्वाचे. त्या संस्कारांवर इतर समाजातील घट्क  करणारे संस्कार सहजा सहजी ओव्हरपॉवर करू शकत नाही. आपले आईवडील कसे वागतात याकडे पाहूनच मुलांचे स्वतःचे विचार मनात पक्के होत असतात.  घरात जर मुलांनी लहानपणा पासुनच जर वडिलांना आईला मारहाण करतांना पाहिले असेल, तर त्या मधे अयोग्य वाटणार नाही. मला वाटतं की   सर्व्हेचा जो निकाल आलाय , त्याचे कारण पण  कदाचित त्या मुलांच्या घरची  परिस्थिती किंवा  वातावरण  असावे- आणि जर खरंच असे असेल तर ते काळजीचे कारण आहे.
आज स्त्रिया स्वावलंबी झाल्या आहेत, शिकल्या आहेत, स्वतः पैसा कमावू शकतात, इतकं असतांना पण त्यांनी अशा प्रकारे मारहाण करुन घेण्याची मानसिक तयारी दाखवावी हे मला खरंच पटत नाही. जर ५४ टक्के स्त्रियांना नवऱ्याकडून होणारी  मारहाण  योग्य वाटत असेल तर हे शिक्षण व्यर्थ आहे असे खेदाने म्हणावे लागेल. स्त्रियांनी स्वतःचे ’स्व’त्व ओळखून या अशा मारहाणीचा निकराने प्रतिकार करायला हवा असे   मला वाटते.
इतर देशातला सर्व्हे रिपोर्ट. काही मुस्लीम बहूल भागात हे योग्य असे वाटणारे ९० टक्के स्त्रिया आहेत  (!)

No comments:

Post a Comment