Friday, 13 April 2012

ब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...

गेल्या महिन्यातली गोष्ट. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात स्टीव्ह ग्रोव्ह अफगाणिस्तानात गेला होता. गुगलच्या युट्युबतर्फे त्याच्याकडे जी कामगिरी देण्यात आली होती ती थोडी जिकीरीची होती. अफगाणिस्तानात जाऊन तिथलं माध्यमाचं जग, आणि मुख्यत्वे तिथल्या इंटरनेटच्या संबंधातलं वातावरण त्याला अभ्यासायचं होतं. ह्या अभ्यासासाठी गुगलच्या प्रतिनिधींचं एक पथकच अफगाणिस्तानला गेलं होतं. त्यात स्टीव्ह होता.
अफगाणिस्तानातल्या आपल्या काही दिवसांच्या वास्तव्यात, आणि भटकंतीत, त्याला एक अफगाण तरूणी भेटली. तिचं नाव परी अकबर. अफगाणिस्तान सरकारी कार्यालयात परी नोकरी करीत होती. नुकतीच तिला तिची नोकरी गमवावी लागली आहे. त्याचं कारण एकच - परी ब्लॉग लिहीत होती. त्या ब्लॉगचं नाव मिलाद. ह्या वेब पत्त्यावर तुम्ही परीचा ब्लॉग पाहू शकता. तुम्हाला पर्शियन (दैरी) लिपी वाचता येत नसेल तर तो मजकूर तुम्ही वाचू शकणार नाही. पण मजकूराची लांबी तुमच्या डोळ्यात भरल्याशिवाय राहणार नाही. परी अकबर अफगाणिस्तानातल्या स्त्रियांचे प्रश्न आपल्या ब्लॉगमधून सातत्याने मांडत होती. तिच्या ब्लॉगला वाचकवर्गही लाभत होता. जसजशी वाचकसंख्या वाढत गेली तसतसा परीच्या मागे इतर सहकाऱ्यांचा ससेमिरा सुरू झाला. परीला तिचा ब्लॉग थांबवण्यासाठी सतवणं सुरू झालं. पण परी बधली नाही. तिने लिखाण चालूच ठेवलं. ब्लॉगची लोकप्रियता कमी होईना, ती वाढतच राहिली. शेवटी परीला धमक्या येऊ लागल्या. आता आपला जीव धोक्यात आला आहे हे परीनं जाणलं. तिने आपली सरकारी नोकरी सोडली..
परीसारखेच इतरही दहा-बारा ब्लॉगर्स स्टीव्हला अफगाणिस्तानात भेटले. आपण म्हणतो की 2011 मध्ये आता अफगाणिस्तान मुक्त आहे. पण परंपरेतही काही अदृश्य तालिबानी वृत्ती लपलेल्या असतात.
स्टीव्ह ग्रोव्हने ही सारी हकीगत युट्युब च्या अधिकृत ब्लॉगवर दिली आहे. ती ह्या पत्त्यावर तुम्हाला वाचता येईल.
गंमत पहा, की स्टीव्ह आणि गुगल - युट्युबच्या पथकाला अफगाणिस्तान सरकारने अधिकृतपणे आमंत्रण देऊन बोलावलं होतं. आपल्या देशातल्या माध्यम स्थितीचा आढावा ( to examine the content landscape in the region and look for ways to develop and promote more local media in the country) त्या पथकाने घ्यावा अशी अफगाण सरकारची अपेक्षा होती. पण....
मला वाटतं स्टीव्हने लिहीलेली सगळीच हकीगत मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्याच्याच शब्दात वाचावी...

No comments:

Post a Comment