Saturday, 28 April 2012

कत्तलीची रात्र

कदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांना एका मतासाठी पन्नास रुपये दिले जायचे. आता हा आकडा निवडणूक आणि तो उमेदवार यावरून कमी जास्त व्हायचा. आता १९९५ साली पन्नास रुपये आकडा खूप मोठा होता. काही पक्षाचे लोक दारू, कोणाला घरासाठी पैसा, जमीन, काहीना कपडे तर काहींना घरांसाठी सिमेंट आणि काहीना रेशनकार्ड अस बरंच काही द्यायचे. आता मत मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला झोपडपट्टीत हे वाटावेच लागतात. हे मी माझ्या मनाच किंवा कुठल्या वर्तमानपत्रात वाचून सांगत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोष्टी घडतात.
आपण जे आघाड्या किंवा युत्या म्हणतो या सगळ्याच पक्षांना अस करावच लागत. मागील विधानसभेच्या वेळी आमच्या गल्लीत देखील हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. आणि हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पहिले आहे. आमच्या गल्लीत प्रत्येक व्यक्ती किमान बारावी पास आहेत. आमची गल्ली सुशिक्षित समजली जाते. पण तिथेही हा प्रकार सुरु झाला आहे. आता उद्या जेव्हा मी मतदानाला जाईल त्यावेळी कळेलच कोणी कोणी पैसे घेतले आहेत. मागील विधानसभेच्या वेळी आमच्या गल्लीतील काही जेष्ठ आणि वयाने मोठ्या असणाऱ्या आजोबा लोकांनी गल्लीतील मंदिरासाठी निधी घेऊन त्याच्या बदल्यात गल्लीतील सगळ्या नागरिकांनी निधी देणाऱ्या उमेदवाराला मत द्यावे असा प्रस्ताव मांडला होता. आता त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना झापल्यावर पुढे तो प्रस्ताव बारगळला. पण असं आमच्या गल्लीत झालं होत. बर कोणीही त्यातील गरीब किंवा फार गरजू अस नाही. किंवा कोणी अशिक्षित नाहीत. यातील बरेच शाळेत किंवा सरकारी खात्यात खूप मोठ्या हुद्द्यावर होते आणि काही आहेत. आमच्या गल्लीत फार काही जास्त नाही पण पन्नास जणांना मतदानाचा अधिकार आहे.
आता आपण स्पष्टच बोलूयात. मागील लोकसभेच्या वेळी निवडणुकीत पन्नासपैकी पाच जणांनी मतदानच केल नाही. उरलेल्यापैकी चौदा जणांनी पैसे घेवून मतदान केले. आणि बाकीच्यांचे आपले खरे मतदान. शेजारची संपूर्ण गल्ली पैसे घेऊन मतदान करते. त्या गल्लीत किमान तीनशे मतदार आहेत. आता नुसता दोन गल्लीचा हिशेब लावला तर त्यातील ३१ जणांनी केलेले खरे मतदान. आता शहरी भागात जरी दिसत नसले तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात होते. आता घरी येताना आमच्या येथील गणेश मंदिरात काही मुले निवडणूक केंद्र आणि वेळेची पत्रके घेऊन हिशेब लावीत होती. त्यांच्याकडे दहा बारा मोठ्या पिशव्या होत्या. ते बघूनच मी इथेही कत्तलीची रात्र होणार हे मी समजून गेलो होतो. आमच्या भागात रेल्वे स्टेशनपासून ते आमच्या बिजलीनगरपर्यंत खूप मोठी झोपडपट्टी आहे. किमान पाच एक हजार सहज मतदार असतील. अजून चिंचवड गावातील चाफेकर चौकात असलेली झोपडपट्टी वेगळीच आहे. पुण्यात तर काही विचारूच नका, निम्मे मतदार झोपडपट्टीतले. ह्या कत्तलीच्या रात्री काही दारू पितात, तर काही आपआपल्या सोसायट्यांना उमेदवारांकडून रंगरंगोटीची कामे करून घेतात. तर काही आपली अनधिकृत बांधकामाला अधिकृत करून घेतात. आता हे मी बघितलंय म्हणून बोलत आहे.
बंर अस करून देखील कोणताही फालतू उमेदवार कसा काय निवडून येतो म्हटलं तर त्याला आपणच जबाबदार आहोत. आमच्या कंपनीत मी, माझा एक मित्र आणि कदाचित माझा बॉस सोडून कोणीही मतदानाला जात नाहीत. त्यांचे कधी पेमेंट स्लीप बघा. आता माझा मित्र बोपोडीत राहतो. त्यांच्या अख्ख्या मतदार संघात हेच चालत. यावेळी बहुतेक त्यांच्याकडे हजार रुपये मत अशी कत्तल चालू आहे. आता ह्या विषयावर कंपनीत बोलल्यावर जे कधीच मतदान करत नाहीत. त्यांना पैसे घेऊन मतदान करण चुकीच वाटल. पण त्याचा काय उपयोग. ते म्हणतात न ‘दुसऱ्याला सांगे ब्रम्हज्ञान स्वत कोरडे पाषाण’ तशातली ही गत आहे. माझ्या चार मित्र आणि त्यांचे घरचे मिळून जवळपास अठरा मतदार आहेत. त्यातले दहा मतदार यावेळी मतदान करतील. ह्याच्यात मी कंपनीतील कोणातच आकडा टाकलेला नाही. साधं सोप गणित आहे. एकूण मतदारातील पन्नास टक्के मतदानच करत नाही. उरलेल्या मतदारांपैकी निम्मे पैसे घेऊन मतदान करतात. आणि उरलेले तुमच्या माझ्यासारखे मग का नाही फालतू उमेदवार निवडून येणार. आणि आपण दिलेली घरपट्टी, पाणीपट्टी, प्रोफेशनल ट्याक्स, इन्कम ट्याक्स अजून काही असतील ते ट्याक्स खाणार. आणि चांगले पक्ष आणि उमेदवार पडणार. हीच कत्तलीची रात्र अनेक उमेदवारांचे भाग्य ठरवते. मतदान हे फ़क़्त नाटक बनून राहते. म्हणजे मी तरी नेहमी मतदान करतोच. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी मुंबईहून आणि या लोकसभेला पुण्याहून पैसे खर्च करून मतदानाला नगरला गेलो होतो. आणि याही वेळी जाणार आहे.

No comments:

Post a Comment