Saturday, 28 April 2012

निर्णय

बायको’चा फोन आलेला. म्हणाली ‘घटस्फोट नको करूयात’. बर, मी नको म्हणालो तर अप्सरापासून दूर जाणार. आणि ‘हो’ म्हणालो तर, या इथे ‘मेव्हणी’ सोबत राहावे लागणार. पण आता फरक फक्त एवढाच असेल की, आधी मी ‘भाड्याच्या’ घरात होतो. होतो कसला, म्हणजे ‘न घरका ना घाटका’ होतो. ना मेव्हणीचे घर माझे होते. आणि ना बायकोचे घर माझे होते. थोडक्यात, बायको आता ‘घरात’ घ्यायला तयार झाली आहे. पण रहायचे मेव्हणीच्या घरी. तस मी तिला बजावलं की, मला दोन स्थळांचा होकार आहे. बघुयात ‘हुंडा’ किती देते ती.
घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर तिला माझी किंमत समजली. असंच असते, जेव्हा कोणी आपल्या जवळ असते त्यावेळी त्याची आपल्याला कधीच किंमत वाटत नसते. दूर गेल्यावर जाणीव होते. चला बर आहे, माझ्या ‘ही’ला म्हणजे बायकोला लवकर जाग आली. काय करावं, ते कळेनासे झाले आहे. निर्णय कोणता घ्यावा? पहा, पहिले ‘स्थळ’ म्हणजे ती कन्या खूप सुंदर आहे. भारतात तिचे नाव आहे. म्हणजे भारतीयच आहे. पण ती मला ‘दोन वर्षे’ घटस्फोट देणार नाही असा ‘करार’ कर म्हणते आहे. इन्शुरन्सचा तिचा स्वतःचा बिझनेस करते. दुसरी ‘नवतरुणी’ आहे. तिचे ओबामाच्या गावाची. तस माझी ही ‘मेव्हणी’ देखील ओबमाच्याच गावाची. पण दोघीत काहीच काहीच तुलना होवू शकत नाही. ही माझी मेव्हणी ‘फॉरेनर’ आहे. आणि हिचे बर्याच देशात बंगले आहेत. असो, मेव्हणी म्हणून फार कोडकौतुक करणार नाही.
आताच बायकोचा फोन येऊन गेला. मला मेव्हणीच्या ‘ह्यांच्याशी’, म्हणजे डीएम. आता म्हणजे म्हणजे काय ”डेडीकेटेड माणूस’ बरोबर हुंड्याच्या बोलणी करून घे बोलली. टाकलाय पत्र त्या माणसाला ‘मुहूर्त’ काढा ‘बैठकीचा’ म्हणून. सकाळपासून बायकोची सारखी फोनाफोनी आणि ‘संदेसे’. त्यामुळे वैताग आला आहे. ते एक गाणे आहे न ‘संदेसे आते है, हमे तड्पाते है|’ तस झालाय अगदी. प्रश्न आता असा आहे की, मी कुणाला हो म्हणू?. मेव्हणीचे नाव खूप मोठे आहे. पण हे हक्काचे ‘घर’ नाही. आणि हे घरात देखील घ्यायला तयार नाही. बर बायकोशी माझी काहीच संबंध नव्हते. हो खरच! फक्त महिन्यातून एक दिवस सबंध यायचा. बर बायको देखील सुंदर आहे. पण, तिनेही कधी घरात घेतले नाही. ‘विवाहित’ असून देखील ‘अविवाहित’. काय उपयोग?
सोडा, मुद्याचे बोलू. मला इथे मेव्हणीच्या पीएमने त्याच्या चुका लपवण्यासाठी, माझ्यावर ‘ब्लेमगेम’ केली. ‘गेमाड’पंथी कुठला! आता हा काय माझा पहिला ‘विवाह’ थोडीच होता. त्याची ‘गेम’ त्याच्या सकट त्याच्या ‘टीम गेमाड’वर उलटवली. तेव्हापासून इथे ‘सासुरवास’ सुरु झाला. बर, ही मेव्हणीने इथे आल्यापासून खूपच फडतूस काम दिलेले. त्यामुळे मी इथे गेल्या एका वर्षापासून ‘पिकनिक’ करीत आहे. बर, सगळ ठीक होते. पण अचानक एके दिवशी ती अप्सरा आली. आणि सगळंच बदलून गेल. अरे आज ती माझ्या डेस्कवर आलेली. आज किती सुंदर दिसते आहे ती! आहाहा! आणि काल.. ती खूप खूप सुंदर. त्यामुळे हे हक्काचे घर असावे खूप वाटायला लागले. बर ते पहिले स्थळ आहे ‘घरंदाज’. पण तिथेही काम काही चांगले देतील याबद्दल शंका आहे. नाहीतर तिथेही ‘पिकनिक’ व्हायची.
त्यामानाने ते दुसरे स्थळ मला योग्य वाटते. मान्य आहे की, तिच्या घराची परिस्थिती नाजूक आहे. परंतु काम चांगले असेल. निदान अशी पिकनिक तर नसेल. काय करू? आणि आज बायकोचा फोन आल्यावर गोंधळात आणखीन वाढ झाली. आता हीच ऐकल तर अप्सरा सोबत राहण्याचा ‘बोनस’. बाकी, फार काय फायदा होईल अस वाटत नाही. निर्णय कोणता घेऊ?

No comments:

Post a Comment