Saturday, 28 April 2012

लोन घ्या आणि आयुष्यभर फेडा

परवा ‘ती’ च्या आई सोबत गप्पा मारत असताना सहजच माझ्या घरासाठी काढलेल्या लोन विषयी चर्चा सुरु झाली. आता माझ लोन फार नाही. त्यामुळे लोन फेडण्याचा कालावधी देखील कमी आहे. काकू म्हणाल्या ‘तुझ बर आहे, चार वर्षात तू लोन मधून मोकळा होशील.’ काकूंचा मुलगा म्हणजे ‘ती’ चा मोठा भाऊ. त्याने मागील महिन्यात डांगे चौकात टू बीएचके घेतला आहे. काकू सांगत होत्या त्याला वीस वर्षे आता कर्ज फेडावे लागणार. आमच्या कंपनीतील बहुतेक सर्वांनीच घरासाठी विविध बँकामधून कर्जे काढली आहेत. बर कर्जे पण अशी न की, वीस – तीस लाखांच्या घरात. आता सगळेच महिन्याच्या महिन्याला पगारातील एक मोठा हिस्सा बँकेला देत असतात. म्हणजे मी पण तसा देतो.
काकूंना म्हणालो की ‘मी आधी घराच्या कर्जासाठी एचडीएफसी बँकेत चौकशी केली होती. आणि त्यांनी मला सहा लाखच कर्ज देखील मंजूर केल होत. त्यांनी सगळा हिशेब करून मला वीस वर्षांसाठी ६३०० रुपयांचा हप्त्याने फेडण्याचे सांगितले होते. मलाही खूप आनंद झाला होता. पण घरी येऊन मी जेव्हा हप्ता आणि महिने याचं गणित केल त्यावेळी लक्षात आल की बँक मला सहा लाखच कर्ज देणार आणि माझ्याकडून हप्त्याने पंधरा लाख बारा हजार रुपये घेणार. एकूणच व्यवहार तोट्यात असल्याने मी कर्ज घेण्याचा निर्णय स्थगित केला.’ त्या म्हणाल्या ‘बरोबर आहे. म्हणजे ती च्या भावाकडून देखील दुप्पटीपेक्षा अधिक घेणार.’ काकुनी मला विचारलं ‘मग तू घरासाठी पैसे कसे जमा केले?’
मी त्यांना सांगितले की आई – वडिलांनी मदत केली. आणि बाकी उरलेल्या रकमेसाठी मी कर्ज घेतलं. खर सांगायचं झाल तर कर्ज घेण टाळावं. म्हणजे मी तरी टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. माझा संगणक घेताना आणि माझा मोबाईल घेण्यासाठी मी प्रथम पैसे जमा केले होते. आणि नंतर वस्तू घेतली. कारण एकदा का कर्ज घेतलं की आपण बंधनात अडकून पडतो. एक तर रुपयाची वस्तू अडीच रुपयाला विकत घेतो. आणि हप्त्याच्या चिंतेपायी नवीन काही खरेदी करण्याचे टाळतो. म्हणजे सद्याला माझ अस झाल आहे की मोठी काही खरेदी म्हटलं की माझ्या डोकेदुखीचा विषय बनून जातो. त्यात माझ्या घराचे माझ्या लग्नाचा घाट घालून बसले आहेत. बहुतेक पुढच्या वर्षीच्या मे महिन्यानंतर मला एखादी मुलगी पसंत करावीच लागेल. माझी सद्याची मिळकत बघता, दोघांचा खर्च आणि कर्जाचा हप्ता सहजपणे निघेल. पण बचत नावाचा काही प्रकार घडण्याची शक्यता फारच कमी वाटते. कारण मी ‘ती’च्या बहिणीला सोडून इतर जेवढ्या मुली बघितल्या आहेत त्यांच्या बद्दल एकाच शब्द वापरावा वाटतो ‘उधळ्या’. आता मला एखादी अशी भेटली की माझ सगळ दिवाळ निघायला फार काही वेळ लागणार नाही. काकू म्हणाल्या ‘आता घर खर्च कसा भागवतो?’ काकूंना सांगितलं ‘आई आहे. पण ती खर्च फ़क़्त खाण्या पिण्यावर करते. बाकी फालतू खर्च नाहीत. उलट ती असल्याने माझा बाहेरचा जेवणाचा खर्च वाचतो.’ एकूण काय काकूंना एवढ तर कळलं की माझ सध्याला सोसो चालू आहे. माझ्या मित्राने मध्यंतरी सांगितलेला किस्सा. त्याच्या एका मित्राने दोन वर्षात पन्नास एक हजारांचा बँक ब्यालंस करून ठेवला होता. पण लग्नानंतर एका वर्षातच तो संपला. जाऊ द्या, नाही तरी खर्च कोणत्या न कोणत्या मार्गाने जाताच असतो. मध्यंतरी मी दोन बुटाचे जोड घेतले. तीन चार महिन्यांपूर्वी नवीन गैस कनेक्शन घेतले. नाही म्हणता म्हणता महिन्यात किमान पाच एक हजार रुपयांचा असा खर्च होतोच.
आता उद्या कर्जाचा हप्ता भरावा लागेल. ह्या बँक पण न काहीना काही निमित्त काढून सुट्ट्या घेतात. आणि इथ माझी गोची होऊन बसते. आता ह्यांच्या सुट्ट्या आणि माझ पेमेंट एकाच वेळेस का होत हेच कळत नाही. मागील महिन्यात सुट्ट्या नव्हत्या पण काहीतरी बँकने घोळ घातला मग पेमेंट जमा व्हायला उशीर झाला. मग काय माझ्या लहान भावाकडून उसने पैसे घ्यावे लागले. आता ताबडतोप दोन दिवसात परत केले ती वेगळी गोष्ट पण अशी वेळ नेहमी येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतो. पण काही खर्चाच गणित काही बसत नाही. यावेळी सुट्ट्यांचे नवे नाटक. कर्ज काढल्यापासून हे दर महिन्याच्या सुरवातीला चिंता सुरु आहे.

No comments:

Post a Comment