Saturday 28 April 2012

पासवर्ड

इतक्या वेबसाईटची अकौंट झाली आहेत ना! आणि प्रत्येकाचे ते यूझर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे दिव्य आहे. आज ते जीमेलाचा पासवर्डमध्ये गोंधळ झाला होता. आठवतच नव्हता. सहा महिन्यांपूर्वी युझर नेम आणि पासवर्डसाठी एक एक्सेलची फाईल बनवून त्यात आठवेल तितके यूझर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवले होते. आणि त्याही फाईलचा पासवर्ड आता आठवत नाही. आता सगळेच पासवर्ड सारखे करायचा प्रयत्न केला होता. पण युझर नेमचे झंझटमुळे शेवटी सोडून द्यावी लागली.
दुसरी भीती अशी वाटत होती की जर उद्या कोणाला पासवर्ड समजला तर सगळीच अकौंट चोरली जातील. वहीत किंवा कुठे नोंद करावी तर तीही कोणी पाहिलं याची भीती. घराच्या संगणकावर मी पासवर्ड रिमेंबर करून ठेवले होते. परंतु आज त्या ‘सी क्लीनर’ नावाच्या सॉफ्टवेअरने सर्व काही क्लीन केली. त्यामुळे आज सगळ्याचं ठिकाणी पासवर्डचा गोंधळ झाला आहे. ‘फोर्गेट पासवर्ड’च्या ठिकाणी क्लिक करून करून आता माझीही त्या आमिर खान प्रमाणे ‘शॉर्टटर्म’ मेमरी तर झाली नाही ना याची शंका येते आहे. बर, माझेही पासवर्ड ठेवण्याची सवय मित्रांप्रमाणे असती तर चांगले झाले असे वाटते आहे. त्यांचे पासवर्ड म्हणजे आवडत्या मुलींची नावे. मी तर किती तरी जणांची त्यांच्या समोर त्यांची अकौंट उघडी करून दाखवली आहेत. अजून फार काय वेगळे करणार तर ते स्वतःची जन्म दिनांक किंवा मोबाईल नंबर पासवर्ड म्हणून टाकणार. परवा माझ्या लहान बहिणीशी बोलतांना ती मला तीचा मेल अकौंटचा पासवर्ड विचारात होती. आणि दोन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण देखील. त्यावेळी मी त्यांना विसरभोळे म्हणून हसत होतो.
आज माझीही तीच परिस्थिती झाली अस म्हणावे लागेल. मध्यंतरी माझ्या एका एटीएम कार्डचा पिन नंबर असंच विसरून गेलो होतो. तीन एक महिने कार्डचा वापरच नाही. मग कशाचा आठवतो आहे लवकर! तीन महिन्यांपूर्वी एक्सेस बँकेच्या अकौंटचा ट्रॅन्सशन पासवर्ड विसरला आहे. तो अजूनही आठवला नाही. बॅंकेत फोन केला तर आमच्या शाखेत येऊन फॉर्म भरा अस सांगण्यात आल. असो, पासवर्ड लक्षात राहिलं असं ठेवावा म्हटलं तर ‘ती’चे नाव आठवते. तसे अजूनही काही पासवर्ड तिच्याच नावाने आहेत. पण मग उगाचंच भूतकाळ आठवतो. एकतर ह्या पावसाळ्यात आणि विशेषतः पाऊस चालू असतांना अनेक चित्र विचित्र गोष्टी मनात येत असतात. नको त्या विषयावर बोलायलाच नको. जाऊ द्या रिसेट केलेत आता पासवर्ड. पण पुन्हा विसरू नये म्हणून काय करावं ते अजून सुचत नाही आहे. स्मरणशक्ती वाढवावी लागले असेच वाटते आहे. माझा मोबाईल नंबर सोडला तर बाकी कोणाचाच मोबाईल नंबर माझा तोंडपाठ नाही. बहुतेक पासवर्ड न विसरणे हेच काय ते उत्तर या प्रश्नावर वाटते.

No comments:

Post a Comment