Tuesday 10 April 2012

MPSC राज्यसेवा (पूर्व) परीक्षा महाराष्ट्र लोक

कोणत्याही देशाचा, राज्याचा, जिल्ह्य़ाचा विकास हा त्या प्रांतातील सुशिक्षित, जागृत, सुजाण, सुसंस्कृत मनुष्यबळावर अवलंबून असतो. ही संपत्ती जितकी सकस, सुविद्य सुसंस्कृत तेवढी देशाच्या विकासाची गती अधिक टिकाऊ असते आणि असा योग्य उमेदवार प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमण्याची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सोपविलेली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात जो उमेदवार चौकस, सुसंस्कृत, कृतिशील, बहुश्रुत, उपक्रमशील कार्यक्षम  असेल तोच चांगली पदे उत्तमरीत्या भूषवू शकेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकतेच अर्ज निघाले आहेत. सरकारी नोकरीचे महत्त्व हे आर्थिक मंदीच्या काळात लक्षात आले आहे.शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना या परीक्षांची नीटशी कल्पना नसते. या परीक्षांचा अभ्यासक्रम काय असतो? या पदांसाठी वेगळा कोर्स आवश्यक आहे का? अनुभवाची गरज आहे का? पदवी परीक्षेत किती टक्के गुणांची आवश्यकता आहे? या अशा बऱ्याच प्रश्नांच्या गोंधळात हे विद्यार्थी असतात आणि पदवी संपादन केल्यानंतर या मुला/ मुलींचा ओढा लागतो तो नोकरी मिळविण्याकडे आणि लगेचच नोकरी लागल्यानंतर या परीक्षांकडे तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून करिअर करायचे या गोष्टी मागे राहून जातात आणि कधीतरी कसातरी थोडासा वेळ काढून, त्यातच जमला तर थोडासा अभ्यास करून यश मिळेल या भाबडय़ा आशेत राहतात आणि मग निकाल तर सर्वानाच माहीत आहे.प्रथमत: या परीक्षांची तयारी करायची मग पूर्ण तयारी योग्य मार्गानेच व्हायला हवी. तसेच या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिकाटी, जिद्द, मेहनत  करण्याची तयारी, नियोजन, सातत्य, याबरोबरच संयम हादेखील गुण असायला हवा. अगदीच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असे नाही. यश मिळाले नाही तर पुन्हा त्याच जोमाने तयारी करायला हवी आणि पूर्व परीक्षेत यश मिळाले तर पुन्हा त्याच जोमाने परीक्षेची तयारी करायला हवी आणि पूर्व परीक्षेत यश मिळाले नाही तर पुन्हा त्याच जोमाने परीक्षेची तयारी करायला हवी आणि पूर्व परीक्षेत यश मिळाले तर मुख्य परीक्षा मुलाखत या दोन चाचण्यांतून जायला हवे. सर्व तिन्ही स्तरांवर यशस्वी झालात तर साधारणपणे एक ते दीड वर्षांनंतर तुम्हाला पद मिळेल आणि हो या तीन स्तरांवरील एका परीक्षेत जरी तुम्ही अयशस्वी ठरलात तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची. मग इतका वेळ थांबणार कोण? आता थांबायला वेळ आहे का? म्हणूनच संयम हा या स्पर्धा परीक्षातील एक महत्त्वाचा गुण आहे.स्पर्धा परीक्षांत यश मिळवायचे म्हणजे संयम, अभ्यासातील सातत्य, अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ, जिद्द, प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी या सर्व गुणांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे यशासाठी आवश्यक सकारात्मक विचार. लक्षात ठेवा आपला दृष्टिकोन म्हणजे आपल्या मनाची भूमिका. त्यामुळे यश मिळवायचेच हा दृष्टिकोन ठेवून परीक्षेची तयारी करायला हवी. हा दृष्टिकोन ठेवणारेच उमेदवार यश मिळवू शकतात. स्पर्धा परीक्षांचे एक वेगळे तंत्र आहे. हे तंत्र अवगत करणारे त्यांचे करिअर उत्कृष्ट बनवू शकतील.

No comments:

Post a Comment