Saturday 28 April 2012

प्रेम रोग

आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
प्रेम रोगाचा इतिहास-
ह्या रोगाचा उगम कधी झाला हे सांगणे खूप अवघड आहे. यावर संशोधक संशोधन करीत आहेत. कदाचित मानवाच्या वंशाजांपासून याची सुरवात झाली असावी, अस त्यांचे मत आहे.
प्रेम रोगाची ठिकाणे-
हा रोग कोणालाही होवू शकतो. आजकाल टीव्ही सिरीयल आणि चित्रपटांच्या प्रसाराने लहान मुले देखील याला बळी पडू शकतात. सामान्य दिसणाऱ्या अथवा सुधृढ शरीर यष्टी असलेल्या कोणत्याही स्त्री/पुरुष/वृद्ध* [निशब्द- मधील बिग बी ला देखील या रोगाने पछाडलेले]/लहान मुले यांना हा रोग होवू शकतो. या रोगाचा प्रसार कुठेही होवू शकतो. परंतु शाळा, कॉलेज, रस्ता, चाळ, कंपनी, कॅन्टीन, सोसायटीच्या आवारात असा कुठेही हा रोग होवू शकतो.
प्रेम रोगाची लक्षणे-
हे सर्व ‘कळत नकळत’च घडत असल्याने ह्या रोगाची अशी विशिष्ट लक्षणे नाहीत. परंतु, सामान्यतः खालील गोष्टी ह्या रोगाच्या बळी पडलेल्या व्यक्तीला होतात.
  • विशिष्ट एका व्यक्तीच्या असण्याने/दिसण्याने/संपर्कात आल्याने अचानक प्रफुल्लीत होणे.
  • ती विशिष्ट व्यक्ती सोडून दुसरे कोणीच व्यक्ती आपलेसे न वाटणे.
  • सतत त्याच एका व्यक्तीबद्दल प्रेमभाव निर्माण होणे.
  • व्यक्ती समोर आल्यावर धडधड वाढणे, घाम फुटणे, जीव कावरा बावरा होणे.
  • त्या व्यक्तीसमोर काहीच बोलता न येणे.
  • परंतु त्याच व्यक्तीसमोर सतत जाण्याची अथवा व्यक्तीच्या संपर्कात राहण्याची इच्छा होणे.
  • सतत त्याच व्यक्तीचे विचार येत राहणे. त्यामुळे व्यवस्थित झोपही न येणे. अथवा झोपेत त्याच व्यक्तीबद्दल स्वप्न पडणे.
  • मित्र/मैत्रिणी सोबत असतांना देखील एकटेपणा वाटणे.
  • त्या व्यक्तीबद्दलच गप्पा माराव्या वाटणे.
  • सर्व ठिकाणी त्या विशिष्ट व्यक्तीचा आभास होणे.
ही सामान्य लक्षणे समजावीत. याहून कितीतरी अधिक लक्षणे व त्यांच्या माहितीसाठी ‘कळत नकळत’च्या मधुरा पाठक (देशमुखांच्या ‘ऋजुता’ला) भेटावे.
प्रेम रोगाचे (दुष्प)परिणाम-
जीवनावर याचे गंभीर परिणाम होतात. प्रेम रोग ग्रस्त व्यक्ती न व्यवस्थित राहते. न ज्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले प्रेम, त्या व्यक्तीला राहू देते. सतत रोग ग्रस्त व्यक्ती प्रेमभाव वाटणार्या व्यक्तीच्या अवतीभवती फिरते. झोप व्यवस्थित न झाल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे मनस्ताप व चिडचिड होण्याचा संभव. कदाचित जर ती विशिष्ट व्यक्ती चांगल्या प्रकारे वागणूक देत असेल तर, ह्याच्या उलटही घडू शकते. परंतु सामान्यतः लाखास एक असे प्रमाण असल्याने याचे सुपरिणाम पेक्षा संभाव्य धोक्याचीच चिंता केलेली योग्य.
प्रेम रोगावर उपाय-
ह्यावर अजून कोणताही इलाज शोधला न गेल्याने हा रोग ‘नाईलाज’ आहे. परंतु, रोगमुक्त झालेल्या व्यक्तींच्या अनुभवावरून काही उपाय
  • आत्महत्या- हा सर्वोत्तम उपाय आहे. सर्व नाईलाज रोगांचा उत्तम व सोपा उपाय.
  • त्या व्यक्तीसोबत ‘लग्न’ करावे. व्यक्तीचे खरे स्वरूप आपोआप कळून जाईल.
  • ते न शक्य झाल्यास दुसर्या कोणत्या तरी व्यक्तीच्या प्रेमात पडावे.
  • विवेकानंदांची अथवा साधू पुरुषांचे/अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करावे.
  • एक आकर्षण आहे, असा स्वतःचा समज करून घ्यावा. त्याकरिता जेम्स बॉन्डचे जुने चित्रपट पाहावेत. अथवा स्वतः जेम्स बॉन्ड आहोत असा समज करून घ्यावा.
  • हे सर्व शक्य न झाल्यास त्या व्यक्तीला मनातील सर्व सांगून टाकावे. कदाचित ती व्यक्ती चिडली तर रोग कमी होण्याची अधिक शक्यता.
  • वरील सर्व उपाय न जमल्यास दारू, सिगारेट अथवा अन्य एखादे व्यसन लावून घ्यावे.
  • तेही न शक्य झाल्यास ‘रडत’ बसावे.
  • हा सर्वात अवघड परंतु रोग निदान उपाय – त्या व्यक्तीला आपल्या प्रेमात पाडावे. यासाठी एखादा ‘प्रेमगुरु’ अथवा रेडीओ वरील कार्यक्रमांचा आधार घ्यावा. अथवा ज्यांनी हा उपाय शक्य करून दाखवला त्यांची मदत मागावी.
  • यातील कोणताच उपाय करू न शकल्यास स्वतःला बेकार समजून नुसते आकाशाकडे किंवा एकटक पाहत बसू नये. कारण ह्या गोष्टीमुळे कामाचा व्याप वाढला असेल. तो डोंगर कमी करावा. ‘गझनी’ मधील अमीर, ‘देवदास’ मधील शारुख अथवा ‘तेरे नाम’ मधील सलमान समजून वागू नये.
इतरांसाठी एक विशेष सूचना-
जर तुम्हाला या लक्षणाचा कोणी रोगी आढळल्याला त्यावर भूतदया दाखवावी. वेडा अथवा मूर्ख समजून त्याची हेटाळणी करू नये.. परंतु धोका नको म्हणून वेड्याचा इस्पितळाचा नंबर घेऊन ठेवावा.

No comments:

Post a Comment